- अविनाश साबापुरेयवतमाळ - अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे.राज्यात दुष्काळीस्थिती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य शासनाने १८१ तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळीस्थिती घोषित केली आहे. अशा दुष्काळी २६ जिल्'ातील ४० हजार २८८ शाळा दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश भागात येतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीतही दररोज पोषण आहार शिजवून द्यावा लागणार आहे. शिवाय आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे व इतर पौष्टीक आहार द्यावा, अशी सूचना संचालकांनी केली आहे.तर दुष्काळी भागात न मोडणाऱ्या इतर शाळांना मात्र केवळ शैक्षणिक सत्र संपेपर्यंतच पोषण आहार पुरविण्याचे आदेश आहे.सुट्टी असताना विद्यार्थी येणार शाळेत?गेल्या तीन वर्षांपासून राज्यात विविध भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती उद्भवत आहे. ते बघता दरवर्षीच्याच उन्हाळी सुटीत पोषण आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला जात आहे. उन्हाळी सुटी असताना किती विद्यार्थी केवळ आहार घेण्यासाठी दररोज शाळेत येतात याबाबत साशंकता आहे.
४० हजार शाळांना उन्हाळ्यातही पोषण आहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 4:57 AM