लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी सोमवारी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना शासन अत्यल्प मानधन देत आहे. तेही विलंबाने दिले जात आहे. वारंवार आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे युनियनच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यवतमाळच्या तिरंगा चौकात जिल्हाभरातील महिला कर्मचाऱ्यांनी धरणे दिले. १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या कर्मचाऱ्यांना चपराशी कम कूक अशी नियुक्ती द्यावी, सेंट्रल किचनची पद्धत बंद करावी, अतिरिक्त कामे देऊ नये, प्रत्येक शाळेत गॅस सिलिंडर द्यावा आदी मागण्या केल्या. विजय ठाकरे, दिवाकर नागपुरे, संजय भालेराव, हबीब खान पठाण, नाना उईके, वसंत जाधव, वंदना कावळे, पद्मा वैद्य आदी उपस्थित होते.
पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 9:57 PM