महागाव :
तालुक्यातील आमणी (खुर्द) गटग्रामपंचायतीच्या हद्दीत डंपिंग ग्राउंड तयार करण्यास आमणी आणि करंजखेड ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येथील डंपिंग ग्राउंडचे गेल्या सहा वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.
आमणी, जनुना आणि करंजखेड या तिन्ही गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने डंपिंग ग्राउंड कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार या गावातील नागरिकांनी केला आहे. याबाबत पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप ठाकरे यांच्या नेतृत्वात भरोस चव्हाण, ज्ञानेश्वर इंगोले आदींनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
साधारणतः ६ वर्षांपूर्वी येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून शहरातील कचरा कुठे विसर्जित करावा, या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले आहे.
आमणी गट ग्रामपंचायतीअंतर्गत शेत सर्वे नं. १७ मध्ये १ हेक्टर ९ आर. क्षेत्रातील जागा डंपिंग ग्राउंडसाठी अर्जित करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. दोन्ही ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी तहसीलने पत्रव्यवहार केला. मात्र, आमणी, जनुना गटग्रामपंचायत व करंजखेड ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
जनुना व करंजखेड गावाचा विस्तार होणार असल्याने भविष्यात गावठाणासाठी ही जागा महत्त्वाची आहे. डंपिंग ग्राउंडपासून दोन्ही गावे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे घाणीचा नागरिकांना प्रचंड त्रास होऊन आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
या जागेपासून काही अंतरावर राजोबा देवस्थान, शिव मंदिर, दत्त मंदिर आहे. तेथे नेहमी धार्मिक कार्यक्रम होतात. डंपिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचू शकते. या जागेवर मोठा तलाव आहे. घन कचऱ्याची घाण या तलावात झिरपली तर पाणी अशुद्ध होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित जागेवर डंपिंग ग्राउंड होऊ देणार नाही, असा ठराव दोन्ही ग्रामपंचायतींनी घेतला आहे. ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण निर्माण झाला आहे.
बॉक्स
घनकचरा व्यवस्थापनाचे राजकारण
येथून जवळच असलेल्या एका शेतात मागील काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन केले जात आहे. एका शेतकऱ्याने वाट अडविल्याने गेल्या १२ दिवसांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. यात मोठा भ्रष्टाचार करता यावा, यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नवीन जागी घनकचरा व्यवस्थापन व्हावे, यासाठी संबंधितांचा आटापिटा सुरू आहे.