आर्थिक स्थिती बिघडल्याचा इशारा : दोन पत्रांनी खळबळ यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना मिळालेली दोन पत्रे सध्या सहकार खात्यात चर्चेचा विषय ठरली आहेत. यातील एक पत्र निनावी असून या पत्राने बँकेच्या पैशात पार्ट्या होत असल्याचे बिंग फोडले आहे. तर दुसरे पत्र सरव्यवस्थापकांचे आहे. त्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीकडे संचालकांचे लक्ष वेधत अनेक सुधारणांचा सल्ला दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील काही संचालकांची ‘मौज’ आता लपून राहिलेली नाही. पूर्वी बँकेतच रंगणारा ‘डाव’ काही ज्येष्ठ संचालकांच्या आक्षेपानंतर बंद झाला असला तरी त्याची जागाच तेवढी बदलली आहे. मुख्यालयाऐवजी दौरा असेल त्या भागातील शाखा अथवा शासकीय विश्रामभवनात हे डाव रंगू लागले आहेत. त्याबाबत जिल्हा बँकेच्या संचालकांचे कान टोचणारे एक निनावी पत्र सध्या चर्चेत आहेत. अनेक संचालकांपर्यंत हे पत्र पोहोचले आहे. संचालकांचे डोळे उघडावे असा मजकूर या पत्रात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची हक्काची म्हणून ओळखली जाते. कर्ज मागणाऱ्या प्रत्येकालाच शेअर्सपोटी रक्कम बँकेत जमा करावी लागते, नव्हे ती कर्जातून सक्तीने कपातच केली जाते. याच रकमेवर बँकेच्या खर्चाचा डोलारा चालतो. परंतु हा पैसा काटकसरीने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरण्याऐवजी अलिकडे त्याचा ओल्या पार्ट्यांसाठी गैरवापर होत असल्याची बाब या पत्रात नमूद आहे. आर्णी तालुक्यातील कधीकाळी राजकीय वर्चस्वाचे केंद्र बिंदू ठरलेल्या गावात या ओल्या पार्ट्या होत असून त्यासाठी सर्रास बँकेचा पैसा वापरला जात असल्याचे पत्रात उल्लेखीत आहे. या पत्राने संचालक अस्वस्थ झाले आहे. असेच एक पत्र बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सर्व संचालकांना दिले आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती, ती सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, बदल, बँकींग स्पर्धेत टिकण्यासाठी नव्या योजना असे विविध मुद्दे त्यात नमूद करण्यात आले आहे. बँकेच्या अलिकडच्या इतिहासात पहिल्यांदाच कुण्या अधिकाऱ्याने संचालकांना बँकेच्या ‘वास्तव’ स्थितीबाबत अवगत करण्याचे धाडस दाखविले हे विशेष. त्यांचे हे धाडस संचालक स्वीकारतात की नाकारतात यावर बँकेचे आर्थिक भवितव्य अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बँकेच्या पैशाने ओल्या पार्ट्या
By admin | Published: July 15, 2014 12:12 AM