अविनाश साबापुरे, यवतमाळ: कॅन्सरचे लवकर निदान होणे, त्यावर वेळेत उपचार होणे यादृष्टीने राज्य शासन लवकरच कर्करुग्णांची अधिकृत गणना सुरू करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आला असून, त्याला मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर ‘नोटीफायेबल डीसीज’च्या यादीत कॅन्सरचा समावेश होणार आहे.‘लोकमत’ने १२ डिसेंबरला ‘खर्चिक निदानाची पद्धती वाढतेय कॅन्सर रुग्णांचे मृत्यू’ हे वृत्त प्रकाशित केले होते. याच मुद्द्यांवर येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात बेमुदत उपोषण केले होते.
या बाबींची दखल घेत शासनाने आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून राज्यातील कॅन्सर रुग्णांबाबतची माहिती मागविली होती. त्याबाबत आरोग्य सेवा सहसंचालक डाॅ. विजय बाविस्कर यांनी आरोग्य मंत्र्यांना सविस्तर माहिती सादर केली. त्यात कॅन्सर रुग्णांची अधिकृत गणना करण्याबाबत व नोटीफायेबल डीसीजमध्ये कॅन्सरचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे डाॅ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले आहे. ‘लोकमत’ने आपल्या वृत्तात उपस्थित केलेल्या पाच मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्र्यांना माहिती सादर करण्यात आली. त्यात हरयाणा व त्रिपुराप्रमाणे महाराष्ट्रातील गरीब कॅन्सर रुग्णांना पेन्शन देण्याचा मुद्दा, जनआरोग्य योजनेतील २५ टक्के रक्कम रुग्णांना रोख देण्याचा मुद्दा धोरणात्मक बाब असल्याने याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागण्यात आले आहे, तर कॅन्सरच्या माेफत निदानासाठी एकही स्वतंत्र योजना नसल्याचे मान्य केले आहे. परंतु, उपचारासाठी आरोग्य विभागाकडून कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे. त्यात जनआरोग्य योजनेत राज्यातील १०३७ रुग्णालये संलग्नित असल्याचे म्हटले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत लाभ मिळालेले कॅन्सर रुग्ण
- उपचार पद्धती : रुग्ण : उपचार संख्या : क्लेमची रक्कम
- मेडिकल ऑन्कोलाॅजी : १,१६,६३० : ७,५५,७१३ : ४१०,५६,४५,६६९
- रेडिएशन ऑन्कोलाॅजी : ८५,७५२ : ९९,५९० : ४९३,२६,०२,२५०
- सर्जिकल ऑन्कोलाॅजी : ५५,७८३ : ८२,६८९ : २२२,५०,३२,६७२
- एकूण : २,५८,१६५ : ९,३७,९९२ : ११२६,३२,८०,५९१
रुग्णांनो, तुमच्यासाठी आहेत या सुविधा- पाॅपुलेशन बेस्ड स्क्रिनिंग उपक्रमात ३० पेक्षा अधिक वयोगटातील महिला, पुरुषांचे आशा वर्करमार्फत मूल्यांकन. या मूल्यांकनात कर्करोगाची लक्षणे आढळल्यास व्हीआयए, पॅप स्मिअर टेस्ट, सीबीई, ओव्हीई या सेवा मोफत दिल्या जातात.- वरील तपासणीनंतर कर्करोग निदानासाठी रेडियो डायग्नोसिस (सीटी स्कॅन व एमआरआय स्कॅन), हिस्टो पॅथाॅलाॅजीसाठी (बायोप्सी व पॅप स्मिअर टेस्ट) संलग्नीत आरोग्य सेवा संस्थेत संदर्भीत केले जाते.- राज्यातील ३१ शासकीय रुग्णालयात माेफत सीटी स्कॅन सेवा सुरू करण्यासाठी शासनाने मे. कृष्णा डायग्नोस्टिक कंपनीसोबत करार केला आहे. त्यांना या सेवेसाठी १७ रुग्णालयांनी जागाही हस्तांतरित केली आहे. सद्य:स्थितीत या कंपनीमार्फत मंचर, इंदापूर, पनवेल, इचलकरंजी, देगलूर या पाच उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन कार्यान्वित झाली आहे.- राज्यातील २२ पैकी ठाणे विभागातील पाच जिल्हा रुग्णालयात माेफत एमआरआय सेवेकरिता शासनाने मे. युनिक वेलनेस कंपनीसोबत करार केला आहे, तर उर्वरित १७ जिल्हा रुग्णालयात एमआरआय सेवा देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.- तसेच एचएलएल या खासगी संस्थेमार्फत कर्करोग निदानासाठी हिस्टो पॅथाॅलाॅजी, सायटोलाॅजी, बोरमॅरो अस्पिरेशन, पॅप स्मिअर टेस्ट, ट्यूमर मार्कर या चाचण्या उपलब्ध असल्याचे सहसंचालक डाॅ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
कॅन्सर रुग्णांना परिहार सेवा
१७ जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर परिहार सेवेसाठी ‘पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक’ सुरू असून, त्यापैकी ८ ठिकाणी १ प्रशिक्षक वैद्यकीय अधिकारी, ४ नर्सेस व १ मल्टी टास्क वर्करची नियुक्ती आहे. पॅलिएटिव्ह कार्यक्रमात समाविष्ट जिल्हा रुग्णालयात परिहार सेवेसाठी १० खाटा राखीव आहेत. परिहार सेवेत बाह्यरुग्ण, आंतररुग्ण सेवा, गृहभेटी, समुपदेशन, माॅर्फिन व इतर औषध पुरवठा, आशासेविकांना गृहभेटीकरिता ड्रेसिंग किट या सुविधा दिल्या जात असल्याचे आरोग्य सेवा सहसंचालक डाॅ. विजय बाविस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या उपोषणानंतर ही माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. मात्र, कॅन्सर निदानासाठी स्वतंत्र योजना नसल्याचे त्यात मान्य केले. मोफत निदान व उपचार यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी स्वतंत्र निदान योजना आवश्यक आहे. असे झाल्यास खासगी रुग्णालयातही गरिबांना एकाच ठिकाणी निदान व उपचार मोफत मिळतील. सध्या अनेक महागड्या चाचण्या शासन स्तरावरही उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांचे निदान होत नाही.- सतीश मुस्कंदे, संचालक, ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटर, यवतमाळ