अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविताना शिक्षण विभागाने गेल्या पाच वर्षांत उपक्रमांची अक्षरश: चळतच मांडली आहे. हे उपक्रम गावोगावच्या शिक्षकांपर्यंत पोहचविताना विद्या प्राधिकरणाला मेहनतही घ्यावी लागली; मात्र आता हेच उपक्रम महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिक्षकाला घरबसल्या समजून घेता येतील. कारण त्यासाठी विद्या प्राधिकरण स्वत:चे फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट आणि यूट्यूब चॅनलही सुरू करणार असून राज्य शासनाने त्यासाठी परवानगीही दिली आहे.आतापर्यंत शिक्षक वैयक्तिक पातळीवर सोशल मीडियात आपापले ग्रुप तयार करून शैक्षणिक उपक्रमांची आदान-प्रदान करीत आहेत, मात्र त्यात अनेकांना ‘खात्री’ वाटत नाही. एका शिक्षकाने दुसऱ्यापर्यंत पोहोचविलेला उपक्रम कितपत खरा याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती.मात्र आता विद्या प्राधिकरणाचे सर्व उपक्रम, अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती, शिक्षकांची प्रशिक्षणे, परिपत्रके एकाच अधिकृत ‘चॅनल’द्वारे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सोशल मीडियात सध्या शिक्षकांनी चालविलेला उपक्रमांचा धमाका यापुढे अधिकृत सोशल अकाउंटवर उपलब्ध होणार आहे.राज्य शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी गुरूवारी यासंदर्भातील अध्यादेश निर्गमित केला आहे. यासाठी कोणताही निधी मंजूर केला जाणार नाही, या अटीवर शासनाने विद्या प्राधिकरणाला अधिकृत सोशल मीडिया अकाउंट उघडण्यास परवानगी दिली आहे.प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र चॅनेलजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) माध्यमातून जिल्हाभरातील शाळांमधील उपक्रमांचे नियमन केले जाते. शिक्षकांची प्रशिक्षणेही डायटच राबवित असते. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा स्तरावरील ‘डायट’लाही स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. त्या माध्यमातून गावोगावी न पोहचता किंवा शिक्षकांना जिल्हास्तरावर न बोलवताही डायटच्या उपक्रमांचा प्रसार करणे शक्य होणार आहे.
शैक्षणिक उपक्रमांचा आता अधिकृत ‘सोशल’ धमाका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 12:32 PM
विद्या प्राधिकरण स्वत:चे फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट आणि यूट्यूब चॅनलही सुरू करणार असून राज्य शासनाने त्यासाठी परवानगीही दिली आहे.
ठळक मुद्देराज्य शासनाची परवानगीफेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट, यूट्यूब चॅनलही येणार