महासंवादासाठी जिल्हावासीयांना आवाहन : मराठा सेवा संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशनयवतमाळ : मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील ३१ विविध जातीच्या संघटनांचे पदाधिकारी एकाच विचार मंचावर येणार आहे. या अधिवेशनातील ‘महासंवादा’त जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२४, २५ व २६ डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाचे आयोजन अकोला येथे करण्यात आले आहे. अठरापगड जातींच्या बहुजन संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन विचारमंथन व्हावे हा या महाअधिवेशनाचा उद्देश आहे. अकोला जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह सर्व ३३ कक्ष अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहे. २४ डिसेंबरला दुपारी १ वाजता मिरवणुकीने अधिवेशनाचा प्रारंभ होईल. संध्याकाळी चित्रपट कलावंतांचा ‘रंगवेध’ कार्यक्रम होईल. २५ डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक, कलावंत उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अकोलाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आहेत. समाजकारण, राजकारण व उद्योग क्षेत्रात मराठा महिलांचे स्थान या चर्चासत्रात माजी आमदार रेखाताई खेडेकर, खासदार भावना गवळी, वंदना चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, अॅड.समृद्धी पोरे, स्मिता देशमुख, शाहिस्ता कादरी सहभागी होणार आहे. युवकांसाठी प्रशासकीय सेवा संधी या विषयावरील चर्चासत्रात प्रभाकर देशमुख, मधुकर कोकाटे, ज्ञानेश्वर पाटील, प्रतीक ठुबे, आशिष ठाकरे, हर्षल भोयर, अनिता पाटील, मोक्षदा पाटील, स्वप्नील खेडेकर बोलणार आहे. २६ डिसेंबरला शाहिरांचे पोवाडे, सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आदी कार्यक्रम होईल. त्यानंतर विविध जाती जमातींच्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असलेला ‘महासंवाद’ होणार आहे. माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्राबाहेरील मराठा समाज व त्यांचा समन्वय’ या विषयावर मंथन होणार असून १८ राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहे. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थापक उपाध्यक्ष वसंतराव बेडसे असतील. न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, शिवराज महाराज, बद्रीनाथ महाराज तनपुरे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंके, मा.म. देशमुख, प्रकाश पोहरे, भैयाजी खेडकर उपस्थित राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांनी या अधिवेशनाला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले, पप्पू पाटील भोयर, डॉ.छाया महाले, प्रा.प्रवीण भोयर, यशवंत इंगोले, डॉ.प्रभाकर काळमेघ, साहेबराव जुनघरे, दिलीप झाडे, प्रदीप साळवे, सुरज खोब्रागडे, किशोर देशमुख, राहुल गजापुरे आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
३१ संघटनांचे पदाधिकारी एकाच मंचावर
By admin | Published: December 23, 2015 3:24 AM