वणी : शासनाने शेतकऱ्यांची कामे त्वरित होण्याकरिता मालमत्ता, शेती खरेदी व्यवहारासाठी आॅनलाईन प्रक्रिया अंमलात आणली आहे. मात्र अप्रशिक्षीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमुळे ही आॅनलाईन फेरफार प्रक्रिया रखडली आहे.सध्या संगणकाचे युग आहे. प्रत्येक कार्यालयात संगणकीय कामकाज सुरू झाले आहे. सर्वच विभागात संगणक आले आहेत. महसूल विभागही संगणकीकृत होत आहे. शासनाने आॅनलाईन फेरफार घेण्याकरिता सक्ती केली आहे. कार्यालय पेपरलेस करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पेपरलेस कामामुळे संगणकीय कामात वाढ करण्यात आली आहे. मात्र संगणकाच्या पुरेशा ज्ञानाअभावी ही प्रक्रिया मंदावली आहे. पूर्वी प्रत्येक कार्यालयात कागदी काम होत होते. त्यात संबंधित अदिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिकांचा वेळ वाया जात होता. शेतकरी, नागरिकांना त्वरित कागदपत्रे, प्रमाणपत्रे मिळत नव्हती. त्याममुळे सर्वच कार्यालये पेपरलेस करून संगणकीय प्रणालीत आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली. परिणामी सध्या सेतूमधूनही शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाण्याची गरज उरली नाही. त्यांचा शोध घेण्यात त्यांचा वेळही जात नाही. शेती खरेदी-विक्रीत अत्यंत महत्त्वाची असलेली आॅनलाईन फेरफार प्रक्रिया मात्र अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन फेरफार मिळणे कठीण झाले आहे. आॅनलाईन फेरफार घेण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पुरेपूर माहितीच नाही. परिणामी अनेक गावांतील फेरफार दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटूनही झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे.आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मंडळ अधिकारी, तलाठ्यांना संगणकीय स्वाक्षरी करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज होती. प्रत्येक तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडे त्यांच्या संगणकीय स्वाक्षरीची (डीएसी) देण्यात आली आहे. मात्र आॅनलाईन फेरफार कसा घ्यायचा, हेच अनेकांना माहिती नाही. त्यामुळे फेरफारचे काम रखडले आहे. आता तालुक्यातील साखरा, शिवणी (ज.) या परिसरात नवीन कोळसा खाण प्रस्तावित आहे. या खाणीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी मिळणार आहे. त्यात दोन एकरापर्यंत शेती असणाऱ्या व स्वतंत्र तुकड्याचा सातबारा असणाऱ्यांना नोकरी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी म्हणून दोन एकराची विक्री करून देण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी केली आहे. त्यासोबतच फेरफार घेण्याकरिताही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. मात्र शेतकरयांना फेरफार मिळण्यास विलंब होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आॅनलाईन फेरफार रखडले
By admin | Published: January 15, 2016 3:19 AM