लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : एकेकाळी बनविलेले जुने डांबरी रस्ते आजही तेवढेच दर्जेदार व गुणात्मकदृष्ट्या कायम आहेत. तर त्यावर अलिकडे बनविण्यात आलेले रस्ते मात्र वर्षभरही टिकत नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. या नादुरुस्त रस्त्यांची किमान चार वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर कायद्याने निश्चित केली आहे. मात्र कंत्राटदार मंडळी नियमानुसार सदर रस्ता संपूर्ण हॉटमिक्स करण्याऐवजी थातूरमातूर पॅचेसची कामे करून खानापूर्ती करीत असल्याचे प्रकार दृष्टीस पडत आहे.पुसद विभागातील पुसद ते माहूर मार्गावरील गुंज-शिरपूर-खडका हा मार्ग असाच उखडला आहे. गुंज ते शिरपूर या सहा किलोमीटरच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध आणि दोनही बाजूने खड्डे पडले आहे. त्यामुळे नेमके वाहन चालवावे कसे असा प्रश्न चालकांना पडतो आहे. जणू या मार्गावरून पायी चालणाºयालाही धड चालता येणार नाही, अशी गत आहे. विशेष असे वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे बांधकाम झाले आहे. अशीच दैनावस्था पुसद-कार्ला रोडची आहे. या मार्गावरील हॉटमिक्स अक्षरश: गायब झाले आहे. नियमानुसार संबंधित कंत्राटदाराने उखडलेल्या भागाचे संपूर्ण ट्रीटमेंट, पूर्ण मेकअप व हॉटमिक्स करून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ खड्डे बुजवून पॅचेसची कामे केल्याचा देखावा निर्माण केला जात आहे.पुसद विभागातील उमरखेड तालुक्यात बेलगव्हाण घाटातील रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. हा रस्ता आजही सुस्थितीत आहे. मात्र त्यानंतर त्या रस्त्यावर झालेले नवे काम वर्षभरही टिकत नसल्याची ओरड आहे. बहुतांश कामे ही रस्ता रुंदीकरणाची आहेत. या कामात डिफेक्ट लायबेलिटीच्या (डीएलपी) चार वर्षाच्या काळात साईड पट्ट्यांची मुरुमाची कामे, झाडोरा तोडणे, नवी झाडे लावणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदार रस्त्यावरील खड्डे बुजविण्याशिवाय दुसरी कोणतीही कामे करीत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. नवे काम किमान दोन वर्ष सुस्थितीत राहणे व नंतरच्या दोन वर्षात संबंधित कंत्राटदाराने त्याची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. मात्र नवे रस्ते एकाच पावसात आपले खरे रुप दाखवितात. ‘सलोख्या’चे संबंध असल्याने आधीच संपूर्ण देयके मंजूर होतात. पर्यायाने संबंधित अभियंत्यांनासुद्धा कामाचा दर्जा का राखला गेला नाही, असा जाब कंत्राटदाराला विचारण्याची नैतिक सोय राहत नाही. या मिलीभगतमुळेच वाहनधारकांना सलग चार वर्ष चांगल्या रस्त्याचा आनंद घेता येत नाही. अवघ्या वर्षभरातच या आनंदावर विरजण पडते. विशेष असे सरसकट संपूर्ण लांबीचा सुस्थितीतील रस्ता कुठेच पहायला मिळत नाही. एक-दोन किलोमीटर नवीन रस्ता बाकी बहुतांश जुना व पॅचेसची कामे केलेलाच रस्ता असल्याची खंत काही वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे.
जुन्यांचा दर्जा कायम, नवे रस्ते मात्र उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:02 PM
एकेकाळी बनविलेले जुने डांबरी रस्ते आजही तेवढेच दर्जेदार व गुणात्मकदृष्ट्या कायम आहेत. तर त्यावर अलिकडे बनविण्यात आलेले रस्ते मात्र वर्षभरही टिकत नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे
ठळक मुद्देपुसद विभाग : हॉटमिक्सऐवजी पॅचेस करून खानापूर्ती