यवतमाळ : पोळा हा सण शेतकरी, कष्टकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतशिवारात राबणाऱ्या सर्जा राजाच्या जोडीच्या उत्सवाचा हा सण आहे. या सणाला शेतकरी वर्ग पोळ्यात त्यांच्या वेदना मांडणाऱ्या झडत्याही म्हणतो. यावर्षीच्या पोळा सणाला झडत्यांचा माहोल काही औरच आहे. त्यात राजकीय घडामोडीच्या आणि शेतकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या झडत्या गुंजणार आहेत. ५० खोके एकदम ओके या घोषणावरून विधिमंडळाच्या पायऱ्यावर गदारोळ झाला. आता जिल्ह्यातील पोळा सणाला खोक्यांच्या झडत्यांचा रंग चढणार आहे. तशा झडत्या वऱ्हाडी बोलीत तयार झाल्या आहेत. पोळ्याच्या पूर्वसंध्येला त्याचाच माहोल होता.
खाेके रे खोके...पन्नास खोके
गोहाटी गोव्यावरून, धावत आले हो बोके...
त्या बोक्याले, ईडीचा धाक...
मांजर झाले हो, उद्धवचे वाघ...
एक नमन गौरा पार्वती हरबोला हर हर महादेव
या झडतीला नवोदित वऱ्हाडी लेखक नितीन कोल्हे यांनी रंगत भरली आहे. बोरीअरबमधील वऱ्हाडी कवी शंकर बढे यांच्यानंतर वऱ्हाडी बोलीतील झडत्या झडविताना नितीन कोल्हे पाहायला मिळत आहे. त्यांनी यावर्षाच्या पोळा सणासाठी खास झडत्या लिहिल्या आहेत. त्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यात झडत आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या झडत्यांनी त्यात भर घातली आहे. गोवाहटीच्या राजकारणाचे पडसाद या झडत्यात उमटले आहे. ओल्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट करणाऱ्या काही झडत्याही यावर्षीच्या पोळा उत्सवात लक्षवेधक ठरत आहेत.
दुष्काय रे दुष्काय, ओला दुष्काय...
त्या दुष्कायात कास्तकाराचे येले सुरू...
मंत्री साहेब म्हणते हो .... एका मिनिटात बरोबर करू...
कापूस, सोयाबीन, तूर झाली हो मातीमोल...
बांधावर मंत्र्यानं, बेसन भाकर केली हो गोड...
त्या भाकरीच्या मिठाले जागतील का हो मंत्री...
का, आमच्या हातात धतुरा, तुमची गोड संत्री..
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव....
या झडत्यांनी शेतकऱ्यांच्या मनाच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पोळ्याच्या तोरणाखाली झडणाऱ्या या झडत्यांनी गाव शिवारात चांगलीच चर्चा आहे. शुक्रवारच्या पोळा सणातही अशा नानाविध झडत्यांची रंगत पाहायला मिळणार आहे. शेतकरी राजा, त्यांची व्यथा आणि बेजार झालेले शेतशिवार, शेतशिवाराच्या नावावर रंगणारा कलगीतुरा झडत्याच्या रूपात गावशिवारात पाहायला मिळत आहे. यामुळे मनोरंजनासोबत प्रबोधन आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही पोळा सणाच्या तोरणाखाली दिसणार आहे.