यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून बालविवाह रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असतानाही ही प्रथा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच सोमवारी चक्क एकाच मांडवात पाच बालविवाह लावले जात होते. परंतु, या प्रकाराची भनक लागताच प्रशासनाने ऐनवेळी मांडवात धडक देऊन बालविवाह रोखले.
ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा गावात करण्यात आली. या गावात एकाच मांडवात तब्बल आठ विवाह होत असून त्यातील काही मुली अल्पवयीन असण्याची शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली होती. ही माहिती मिळताच तातडीने प्रशासनाने मुलींच्या वयाची शहानिशा केली. त्यावेळी पाच उपवधू अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांच्या मार्गदर्शनात तातडीने हालचाल करण्यात आली. प्रशासनाचे पथक थेट विवाह मंडपात धडकले. नवरी मुलींच्या पालकांना मुलींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. मुलीची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले व एकाच दिवशी होत असलेले पाच बालविवाह रोखले गेले. या सर्व बालिकांना बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कार्यवाहीसाठी घाटंजीचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांचे बालसंरक्षण कक्षाला विशेष सहकार्य लाभले. बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, पोलीस कर्मचारी निलेश घोसे, बालसंरक्षण अधिकारी माधुरी पावडे, क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंदपटेल, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम यांनी पार पाडली.
तीन महिन्यात रोखले २४ बालविवाहजिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच तब्बल २४ बालविवाह रोखले. मे महिन्यात १० तारखेला अक्षयतृतीया आहे. या मुहूर्तावर अनेक बालविवाह होतात, हा दरवर्षीचा प्रशासनाचा अनुभव आहे. म्हणून विविध माध्यमाद्वारे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नियोजित बालविवाहांची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळत आहे. मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह केल्यास हा बालविवाह ठरतो.
बाल विवाह लावणे व त्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा बालविवाहाबाबत माहिती असल्यास गावचे ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील अथवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी