यवतमाळ: आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची वाटेतच साक्षरता मोहिमेसाठी नोंदणी केली जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर गावी परतल्यावर या वारकऱ्यांना स्थानिक शिक्षकांमार्फत धडे दिले जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेऊन साक्षरतेचे प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावच्या अशिक्षित वारकऱ्यांना यंदा पांडुरंग साक्षरतेच्या रुपाने पावणार आहे.
वारीदरम्यान करावयाच्या या नोंदणीसाठी योजना शिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारीच लेखी सूचित केले आहे. सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश खेड्यांतून शेकडो वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. दररोज ३० ते ४० किलोमिटर पायी चालून हे वारकरी एखाद्या गावात मुक्काम करतात. अशा ठिकाणी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे’ पथक त्यांच्या भेटी घेणार आहे. वारकऱ्यांमधील जे लोक असाक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंद करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावातील शाळेचीही मदत घेतली जाणार आहे. आणि हे वारकरी जेव्हा एकादशीनंतर आपापल्या गावात परत जातील, तेव्हा त्यांना गावातील शाळा-शिक्षक किंवा नवभारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांच्या मदतीने साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका..!आळंदी आणि देहू येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरीकडे निघालेली आहे. या दिंडीमध्ये ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ची माहिती सांगणारी व्हॅन सहभागी आहे. त्यामध्ये शिक्षक-स्वयंसेवकाचे एक पथक आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी पथनाट्य, बॅनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्यांचे फ्लेक्स, ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका’ अशा गीतांच्या माध्यमातून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी बोलून नियोजन केल्याचे योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमाबाबत माहिती होणार आहे. वारी संपल्यानंतर ते जेव्हा गावी परत जातील तेव्हा संबंधित शाळेत असाक्षरांची स्वयंसेवकांबरोबर टॅगिंग केली जाईल. त्यानंतर अध्यापनही सुरु केले जाईल. सप्टेंबर किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेसही त्यांना बसता येईल. त्यानंतर त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.- डाॅ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)