आर्णी : तालुक्यातील देऊरवाडी पुनर्वसन येथे मंगळवारी रात्री चौघांनी एकाची हत्या केली. या प्रकरणातील मृतक आरोपींचा काटा काढण्याच्या तयारीत होता. याची भनक लागताच आरापींनीच त्याचा काटा काढल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न होत आहे.
शेख समीर शेख मुस्तफा (२२, रा. शास्त्रीनगर, आर्णी) असे मृताचे नाव आहे. जुन्या वादातून त्याचा मंगळवारी रात्री ७:४५ वाजताच्या सुमारास खून करण्यात आला. यात चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. मृत शेख समीर शेख मुस्तफा याच्यावर आरोपींनी जवळपास १६ ते १८ चाकूचे सपासप वार केले. त्यामुळे शेख समीर शेख मुस्तफा जागीच कोसळला. आरोपी शेख आजीस शेख शम्मी (३६), शेख अरबाज शे. रहीम (३०), जुबेर खान साहेब खान (२४) आणि सय्यद दानीस सैय्यद जाहगीर (२६, सर्व रा. आर्णी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी आणि मृतकात काही महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यात भांडणातून मृताने माफी मागितली होती. परंतु, आरोपींच्या मनात धाकधूक होती. ते संधीची वाट पाहात होते. मृतक आपल्याला संपविण्यासाठी प्लॅन आखत असल्याची त्यांना कुणकुण लागली होती. त्याने आपल्याला संपविण्यापूर्वी त्याचाच गेम करण्याची संधी आरोपी शोधत होते. आरोपींनी संगनमत करून अखेरीस मंगळवारी देऊरवाडी पुनर्वसन येथे समीरचा गेम केला. नंतर चारही आरोपींनी मुबारकनगर येथील मुजबीर रहमान सत्तार खान (४८) यांचे घर गाठून त्यांना दुचाकी जाळल्याची तक्रार का दिली, ती मागे घे, असा दम भरला. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर खुनातील रक्ताने माखलेल्या चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न हुकवल्याने मोठा अनर्थ टळला होता.
या घटनेनंतर आरोपी शेख अरबाज शे. रहीम याने कपाट उघडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुजबीर रहमान यांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. नंतर आरोपींनी पुन्हा एका दुचाकीस्वारास चाकूचा धाक दाखवून त्याच्या दुचाकीवरून चारही आरोपींनी पोलिस स्टेशन गाठले. आरोपींविरूध्द आता भादंवि कलम ४६२, ३०२, ३४, १०९, १२० ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मुजबीर रहमान सत्तार खान यांच्या तक्रारीवरून पुन्हा भादंवि ३०७, ३९३, ४५२, ५०४, ५०६ कलमानुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींच्या शिरावर विविध गुन्हे दाखल
पोलिसांनी आरोपींजवळून खुनात वापरलेला चाकू जप्त केला आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार केशव ठाकरे, उपनिरीक्षक गणपत काळुसे, गजानन अजमिरे, विजय चव्हाण, मिथुन जाधव, ऋषिकेश इंगळे, नफीस शेख, रवी चव्हाण, योगेश संकुलवार, मंगेश जगताप आदींनी भेट दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.