जलसंधारणाचा ध्यास : आदिवासी नवदाम्पत्याने ठेवला समाजापुढे आदर्श ढाणकी : पाणी फाऊंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या गावागावात जलसंधारणाचे काम करीत आहे. जलसंधारणाच्या कामानिमित्त समाजात आश्चर्य वाटावे असे सकारात्मक बदल दिसून येत आहे. उभ्या महाराष्ट्राला पे्ररणादायी ठरावी अशी घटना उमरखेड तालुक्यातील एकंबा येथे घडली. आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्नाचा येथील आदिवासी नवदाम्पत्याने हा अविस्मरणीय सोहळा प्रथम श्रमदान करून साजरा केला आणि नंतरच आयुष्यभराच्या मनसंधारणासाठी बोहल्यावर चढले. एकंबा हे उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील एक दुर्गम छोटेसे गाव. १८० घरे व ८२० लोकसंख्येचे हे गाव आहे. गावातील सर्व कुटुंब आदिवासी असून, आजुबाजुला माळरान आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे तेंदूपत्ता संकलन, रानमेवा विकणे, पशुपालन अशा प्रकारचा आहे. अशा या गावाकडे जगाचे लक्ष जावे असे काम याठिकाणी झाले. वॉटर कप स्पर्धेच्यानिमित्ताने हे गाव चर्चेत आले. गावातील दोन विधवा महिलांनी जलसंधारणाचे काम उभे केले. गावाला पाण्यासाठी एकत्र आणले आणि संपूर्ण गाव कामाला लागले. २६ एप्रिलला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी येथील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर एकंबा येथील नवरदेव उत्तम दिलीप भुरके व नवरी मनीषा साहेबराव खराटे यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमाची महती जोपासून आधी श्रमदान केले. वऱ्हाडी मंडळींनीही श्रमदानात सहभाग नोंदविला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रमदान करूनच ते चढले बोहल्यावर
By admin | Published: May 19, 2017 1:55 AM