लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाचे संपूर्ण गणित एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांवर अवलंबून होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एसटी बस हमखास ठरलेली होती. कोरोनामुळे ही एसटी बस गावातच येणे बंद झाले आहे. अनेक भागात एसटीचा मुक्काम थांबला आहे. विविध भागात एसटी दररोज एक लाख किलोमीटरचा प्रवास करते. ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असतात अशाच ठिकाणी एसटी ये-जा करीत आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी एसटी सध्या तरी बंद आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरूच
कोरोना काळापूर्वी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मुक्कामी बस राहात होत्या. कोरोनामुळे अनेक बस बंद करण्यात आल्या. परिणामी त्या गावात बस मुक्कामी राहणे गेल्या दोन वर्षांपासून बंद झाले. गावात मुक्कामी असलेल्या बसच्या वेळापत्रकानुसार त्या गावातील व मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे वेळापत्रक ठरत होते. बसच्या वेळेनुसार नागरिक आपल्या कामांचे नियोजन करीत होते. मात्र मुक्कामी बस बंद झाल्यामुळे नागरिकांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांचे हाल होत आहे. मुक्कामी बसअभावी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहे.
सर्व बसेस आगारातच
जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये असलेल्या एसटी बसेस सध्या आगारात आहे.एकूण बसेसपैकी आठ ते दहा बसेस इतर आगारांमध्ये मुक्कामी आहेत.शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बसेस सुरू होणार आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बस सुरू होणार एसटी बसेस सुरू करताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतात अशा ठिकाणी एसटी बसेस सुरू आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला असणाऱ्या एसटी बसेस शाळा सुरू झाल्यानंतरच सुरू होणार आहे. - श्रीनिवास जोशीविभाग नियंत्रक, यवतमाळ
रूग्ण घटले; एसटी कधी धावणार?
शाळा सुरू झाल्या आहे. दहाव्या वर्गातील विद्यार्थी विद्यालयात जाण्यासाठी तयार आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी एसटी मिळत नाही. कुणाला तरी खासगी वाहनाने मोठ्या गावापर्यंत जावे लागते. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. एसटीने मुक्कामी बसेस सुरू कराव्यात. एसटीअभावी काही विद्यार्थ्यांना चिखल तुडवित शाळेत जावे लागत आहे. - सुभाष जाधव
ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचण्यासाठी गावातील पहिली बस सर्वांसाठी महत्त्वाची आहे. इतकेच नव्हेतर रात्रीचा हालटिंग टाईम महत्त्वाचा आहे. या दोन्ही गाड्या गावाकडे येणे बंद झाल्या आहे. यामुळे प्रवाशांना जमेल त्या वाहनाने सकाळी शहराकडे प्रवास करावा लागतो. तरच कामे होतात. खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी अवास्तव खर्च करावा लागत आहे. - मयूर मेश्राम