लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बॅंकेतील व्यवहार हा विश्वासावर चालताे. प्रत्येकच बॅंकेतील राेखपालाकडे पैसे देऊन त्याची पाेचपावती घेतली जाते. मात्र, याच विश्वासाला रुंझा येथील विदर्भ काेकण ग्रामीण बॅंकेच्या राेखपालाने तडा दिला. त्याने चार बचत गटांच्या महिलांकडून राेख रक्कम घेतली. त्यांना पाेचपावती दिली. मात्र, रक्कम खात्यात जमाच केली नाही. त्यामुळे बॅंक पैसे देण्यास तयार नाही. पेरणीचा हंगाम ताेंडावर असल्याने हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून या महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या केळापूर तालुक्यातील रुंझा शाखेत महालक्ष्मी बचत गटाच्या अनिता संतोष शिवरकर, सुरेखा गजानन मुल्लेमवार यांचे खाते आहे. महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला ४८ हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर पावती घेतली आहे. त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले. सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६ ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली. मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत. याविषयीचे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती निमीष मानकर उपस्थित हाेते.
आठ महिन्यांपासून चौकशीच सुरू - हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅंकेने राेखपालाची चाैकशी सुरू केली आहे. आता याला जवळपास आठ महिने पूर्ण हाेत आले आहेत. मात्र, बॅंकेने पैसे भरणाऱ्या महिलांना एकही रुपया परत केलेला नाही. बॅंकेच्या शाखेत जाऊन नियमाप्रमाणे पैसे भरल्यानंतर बॅंकेने आमचे पैसे वेळेत परत करावेत, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
पैशाअभावी शेती पडिक ठेवण्याची वेळ - बचत गटाचा हा व्यवहार असून, हे पैसे शेतातील बी-बियाणे, खते खरेदीकरिता ठेवले हाेते. आता बॅंक पैसे देत नसल्याने शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापकांना याविषयी अर्ज दिला. मात्र, त्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नसल्याचेही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.