लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ओटीएस योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत ही व्याज सवलत आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खातेधारक अडचणीतून बाहेर पडतील. बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते. याशिवाय सहा वर्षापेक्षा जास्त काळापासून कर्ज थकलेले असेल तर या योजनेत मुद्दल आणि व्याज रकमेतून २५ टक्के रक्कम कपात करून उर्वरित सर्व रक्कम ठराविक काळात भरली तर शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. ओटीएस योजनेमध्ये एकाच वेळेस काही रक्कम माफ होते, उर्वरित रक्कम भरल्यानंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतो. यामुळे ओटीएस योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणारी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. तरच त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४३१ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांकडे २७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज होते. ते ओटीएस योजनेला पात्र ठरल्याने त्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामुळे हे शेतकरी उर्वरित कर्ज रक्कम भरुन नील झाले आहे. आता पुढील हंगामामध्ये असे शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार आहे. यातून पुढील खरिपाचा हंगाम करताना कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत बँक त्यांना सामावून घेणार आहे. याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कर्ज खाते सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न आहे.
जुन्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करता करता सरकार बदलले आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जुन्या सरकारमधील कर्जमाफीवर आर्थिक तरतूद झालीच नाही. परिणामी कर्जमाफीला पात्र असलेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही थकीत आहे. त्यांना ना जुनी ना नवी अशी कुठलीच कर्जमाफी मिळाली नाही.
जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमधून लाभ मिळाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा अपघात विमाही बँकेने काढला आहे. पूर्वी ही विम्याची रक्कम एक लाख होती. यावर्षी विमा सुरक्षा कवच दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे ही रक्कम तीन लाखापर्यंत नेण्याचा मानस आहे. - टिकाराम कोंगरेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ