यवतमाळ : पीएम जनधन योजनेंतर्गत केवळ सहा टक्के व्याजाने होम लोन मिळत आहे. त्यातही तीन लाखांची सबसिडी मिळणार असल्याची बतावणी करून दारव्हा शहरातील एकाला थेट एक लाख ४९ हजाराने गंडा घातला. फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसात तक्रार दिली.
श्रीकांत शंकरराव खानझोडे (५८) रा.लिटील बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल दारव्हा यांची भामट्यांनी फसवणूक केली. खानझोडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यामध्ये पीएम जनधन योजनेंतर्गत होम लोन, बिझनेस प्रॉप्टी लोन सहा टक्के दरात व तीन लाखाच्या सबसिडीत मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. खानझोडे यांना मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी त्या मॅसेजमधील एका क्रमांकावर संपर्क केला.
कर्ज मंजुरीकरिता सर्व कागदपत्रे व्हॅटस्अॅपद्वारे पाठविले, बँक अकाऊंटचे डिटेल पाठविले, कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होईल, अशी बतावणी आरोपीने केली. मात्र प्रत्यक्षात फिर्यादीच्या खात्यातून दीड लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार २६ डिसेंबर २०१९ मध्ये घडला. त्यानंतर खानझोडे यांनी वारंवार फोन करून लोनच्या पैशाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येवू लागली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खानझोडे यांनी दारव्हा पोलीस ठाणे गाठून भादंवि ४२० नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.