रूपेश उत्तरवार -यवतमाळ : चिमुकल्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक मंडळाने एकात्मिक पुस्तकाचा प्रयोग हाती घेतला आहे. यात पहिली व दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेत दप्तराचे ओझे न्यावे लागणार नाही. त्यांना सर्व विषय एकाच पुस्तकात दिले जाणार आहे. बालभारतीने अशा पुस्तकांच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांत हा प्रयोग राबविला जाईल. तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी असाच प्रयोग राबविण्याचा मानस आहे. सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण देण्याच्या मूळ संकल्पनेला यातून चालना मिळणार आहे.
झेडपीच्या मराठी शाळांमध्येच प्रयोगहा प्रयोग जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांसाठीच राहणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकात ही पुस्तके मिळतील. ‘यू-डायस’मधून विद्यार्थ्यांची नोंद झालेल्या ठिकाणीच ही पुस्तके पोहोचणार आहेत. पुस्तके पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळेल. - प्रमोद सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ