दारव्हा : तालुक्यातील बिजोरा शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
चत्रूजी चव्हाण (५५, रा. बिजोरा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चत्रूजी चव्हाण हे शेळ्या चारण्याकरिता गेले होते. अचानक झुडपात लपलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरेल्या चत्रूजी यांनी आरडाओरडा केली. त्यामुळे जवळच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांना बघून वाघ पळून गेल्याचे सांगण्यात आले. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत चत्रूजी चव्हाण यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापूर्वीसुद्धा याच परिसरात गावकऱ्यांना वाघ दिसल्याची चर्चा होती. आता ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या वाघाच्या हल्ल्याने शेतकरी, मजुरांमध्ये दहशत पसरली आहे.
बॉक्स
वनविभागाकडून चौकशी
हल्ला झालेल्या व्यक्तीने आपण वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे वनविभागाला सांगितले. त्यामुळे तत्काळ वनविभागाची एक चमू चौकशीसाठी परिसरात पाठविण्यात आली. पायाचे ठसे व इतर चौकशीनंतर नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, हे स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.