फोटो
ग्राउंड रिपोर्ट भाग १
विठ्ठल कांबळे
घाटंजी : येथील नगरपरिषदेत घाटी-घाटंजी विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह १८ पैकी १० सदस्य निवडून आले. घाटंजीकरांनी त्यांना एकहाती सत्ता दिली. मात्र, एक वर्षाचा काळ अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संघर्षात वाया गेला, तर दोन वर्षांचा काळ कोरोनात गेला. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली आहे.
शहरात कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान राबविण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर लाखो रुपयांची तरतूद केली. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले.
अशा कचऱ्याचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेल्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. तरीही शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
बॉक्स
घाटंजीकरांना जबाबदारीचा विसर
शहराच्या कोणत्याही भागात फेरफटका मारल्यास मुख्य आठवडी बाजार घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. पांढुर्णा रोड, गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण घाटंजीकरांनी ठेवण्याची गरज आहे.
बॉक्स
नवीन वसाहतीत रस्ते, नाल्या नाही
नवीन वस्तीत रस्ते, नाल्यांची सुविधा नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. त्याची दुर्गंधी पसरते. सरस्वतीनगरमध्ये ही परिस्थिती जाणवते. इतर भागातही तीच् स्थिती आहे
बॉक्स
अतिक्रमणाची समस्या कायम
शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, पोलीस स्टेशनसमोर अतिक्रमणाची समस्या आहे. दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच काही लोक आपल्या गाड्या पार्किंगला लावतात, तर काही गुरे, ढोरे भर रस्त्यात ठिय्या मांडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बॉक्स
रस्त्याचे काम थांबले
पोलीस स्टेशन पाठीमागील वार्डातील संतोष भोयर यांच्या घरापासून ते पांढुर्णा नाल्यापर्यंतचा रोड मंजूर झाला. परंतु ते काम अंतर्गत वादाने थांबले आहे. त्या रस्त्यावर फक्त गिट्टी आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
बॉक्स
मंदिरावर वाढले गवत
घाटंजीचे ग्रामदैवत संत मारोती महाराज यांच्या मंदिरावर वृक्ष, गवत वाढले आहे. आजूबाजूने दुकाने लागली आहेत. अतिक्रमण वाढतच आहे. तेथे त्यांच्या नावाने यात्रा भरते. त्याचे उत्पन्न नगरपरिषदेला मिळते. तेथील अतिक्रमण हटवून मंदिराची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.