महागाव : येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वसुंधरेच्या रक्षणासाठी पाउल उचलले आहे. या उपक्रमातून धरतीच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला आहे.
सध्या संपूर्ण विश्व महामारीच्या विळख्यात अडकून हतबल झाले आहे. मानव लाॅकडाऊनमुळे अज्ञात भीतीने घरात बसून आहे. दुसरीकडे हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन विना रुग्ण कासावीस होत आहे. अशात माहूर तालुका माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीसह पोलीस मित्र फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गजानन भारती, माजी स्वीकृत नगरसेवक जयंत चौधरी व येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेच्या वृक्षांना डिजिटल रंगरंगोटी करून एक पाऊल वसुंधरेकडे नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.
सध्या वृक्षतोडीने
निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून की काय पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढत आहे. विकासाच्या नावावर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणात लाखो झाडांचा ऱ्हास होत आहे. पर्यायाने मानवी जीवांचे प्राण म्हणून समजल्या जाणारा ऑक्सिजनच सुटीवर गेल्यासारखाच आहे. त्यामुळे कोरोनाच्या माहामारीत औषधाऐवजी माणूस ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जगाचा निरोप घेत आहे. यामुळे व्यथित होऊन रस्त्याकडेच्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे. गजानन भारती व सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला. निवृत्त शिक्षणाधिकारी बाबाराव वानोळे, सुजित ठाकूर आदी या अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहे. महागाव ते फुलसावंगी मार्गावरील वृक्षांच्या बुंध्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. यावेळी शेख मन्नान, नारायण भरवाडे, आदित्य भारती, विनोद कोपरकर, बळीराम भवरे आदी उपस्थित होते.