जिल्हा परिषद सेस फंड : १६ तालुके सांभाळणार कसे?यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सरत्या आर्थिक वर्षासाठी साथरोग आणि श्वान दंश लस खरेदीसाठी केवळ एक हजारांची तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे हे पैसेही अद्याप खर्चच झाले नाही. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध योजना राबविण्यात येतात. प्रत्येक विभागाला सेसचा निधी दिला जातो. त्यातून लोकोपयोगी कामे करावयाची असतात. आरोग्य विभागाला गेल्यावर्षी सेस निधीतून ३३ लाख एक हजार रूपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापैकी ११ लाख ७९ हजार २७२ रूपये खर्च झाले आहे. उर्वरित २१ लाख २१ हजार ७२८ रूपये अद्याप अखर्चित आहे. विशेष म्हणजे यात तब्बल तीन लाखांची तरतूद कोर्ट केसेससाठी करण्यात आली होती. त्यातील दोन लाख ९१ हजार रूपये खर्चही झाले. सेस फंडातून जिल्ह्यातील दुर्धर रोगग्रस्त रूग्णांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन लाखांची तरतूद होती. त्यापैकी रूग्णांना एक लाख नऊ हजार १५८ रूपयांचे सहाय्य देण्यात आले आहे. पाणी गुणवत्ता कार्यक्रम व कार्ड वाटपाकरिता एक लाखाच्या तरतुदीपैकी ९८ हजार ४३० रूपये खर्च झाले. यात सर्वाधिक गमतीशीर बाब म्हणजे साथरोग आणि श्वान दंश लस खरेदीसाठी सेस फंडातून केवळ एक हजारांची तरतूद होती. तीसुद्धा खर्च केली नाही. आरोग्य विभागाकडे अद्याप २१ लाख २१ हजारांचा निधी पडून आहे. (शहर प्रतिनिधी)लेक वाचवा अभियानाचे पाच लाख पडूनचआरोग्य विभागाला सेस फंडातून जिल्ह्यात लेक वाचवा अभियान राबविणे, स्वर्ण जयंती योजना आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी पाच लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र लेक वाचवा अभियानाला या विभागाने बगल दिल्याचे स्पष्ट झाले. अद्यापही हा पाच लाखांचा निधी आरोग्य विभागाकडे पडून आहे. दरमहा होणाऱ्या आरोग्य समितीच्या बैठकीत मात्र हाच विभाग मुलींचे जन्म प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आहे.
श्वान दंश लसीसाठी एक हजारांची तरतूद
By admin | Published: April 21, 2017 2:17 AM