लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सातत्याने ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारात बॅंक खात्यातून पैसे उडविले जात आहे. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ठगबाजांकडून पैसे काढून घेतले जातात. अशा सहा घटना घडल्या. यातून १३ लाख १६ हजार रुपयांची रोख उडविली. शनिवारी किराणा व्यावसायिकाला ऑनलाइन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले. त्यांनी गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये सेंड केले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या तीन बॅंकेतील खात्यातून एक लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. फसवणुकीचे लक्षात येताच इसरानी यांनी पोलीस ठाणे गाठले. मागील आठवडाभरातील ही फसवणुकीची सातवी घटना आहे. कस्टमर केअर सोबत संपर्क करून फसवणूक होत आहे. या गुन्ह्यांचा तपास सायबर सेलकडे दिला आहे.
गुगलवर सर्च केलेला नंबरच ठरतोय धोकादायक - ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या साईट सक्रिय आहेत. बहुतांश जण याचा वापर करून दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी करतात. खास करून महिला यात पुढे आहेत. याशिवाय व्यापाऱ्यांकडूनही ऑनलाईन व्यवहार केला जात आहे. या व्यवहारामध्ये अडचण आल्यास कस्टमर केअरला संपर्क करतात. - कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक माहीत नसल्याने त्या-त्या वेबसाईटचे नाव टाकून त्याचा शोध गुगलवर घेतला जातो. गुगल हे माहितीची महाजाल आहे. त्याठिकाणी असणारी प्रत्येकच माहिती खरी असेल, हे सांगता येत नाही. ठगबाजांनी आता अनेक नामांकित कंपन्यांचे कस्टमर केअर म्हणून स्वत:चे नंबर अपलोड केले आहेत. हे ठगबाज ग्राहकांना हेरुन ऑनलाईन व्यवहारात त्यांचा मोबाईल ॲक्सेस घेऊन बॅंक खात्यातून पैसे उडवतात.