लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लाॅकडाऊनपासून ऑनलाइनखरेदीचा जोर वाढला आहे. यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढलेले आहेत. या दिवाळीमध्ये छोट्या मुलांचे कपडे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन नोंदविण्यात आले. बाजारपेठेपेक्षा याची किंमत कमी होती. मात्र, हे कपडे अर्धवट शिवलेल्या अवस्थेत ग्राहकांना पाठविण्यात आले. आता असे कपडे टेलरकडे पोहोचले आहेत.
दिवाळी सण, त्या निमित्ताने मिळणारे विविध डिस्काउंट पाहता नागरिकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, या शॉपिंगचा झटकाही अनेकांना जोरदार लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर, आता चक्क अर्धवट कपडेच ग्राहकांना ऑनलाइन मागवलेले कपडेही अर्धवट शिवलेल्या अवस्थेत पाठवण्यात आल्याने दिवाळीत नवीन कपडे घालायचे तरी कसे, हा प्रश्न नागरिकांपुढे उपस्थित झाला आहे.
कपडेच नव्हे तर इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू ऑनलाइन दाखविताना वेगळ्या स्वरूपात दिसल्या. प्रत्यक्ष घरी पोहोचल्यानंतर त्या जुन्या तारखेतल्या असल्याचे लक्षात आले. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप झाला आहे. काही प्रकरणात मोठा टीव्ही अथवा फ्रीज ऑनलाइन पाठविण्याची ऑफर देण्यात आली. पैसे पोहोचले मात्र, वस्तू आल्या नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारी समोर येत आहे.
ऑनलाइन खरेदीपूर्वी घ्या काळजी
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना त्या स्क्रिनवर अतिशय सुस्थितीत सादर केल्या जातात. स्वस्त दरात असल्याने ग्राहक या वस्तू खरेदी करण्यासाठी बुकिंग करतो. मात्र, वस्तू हातात पडल्यानंतर त्यातील त्रुटी दिसून पडतात.
यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन वस्तूंची खरेदी करताना नामांकित कंपन्यांकडूनच वस्तूंची खरेदी केली पाहिजे.
ऑनलाइन वस्तू मागविल्यानंतर त्या परत करण्यासाठी अवधी देण्यात येतो. अशा ठिकाणांवरूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजे.
आपले बँक खाते समोरच्या व्यक्तींकडे जाणार नाही, याची खबरदारी वस्तू खरेदी करताना घेतली पाहिजे.
स्थानिकांकडूनच खरेदी केलेली चांगली
जाहिरातीला बळी पडू नका
नवनवीन संकेतस्थळे ऑनलाइन खरेदीसाठी उघडली आहेत. यावर खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. ग्राहकांनी आर्थिक माहिती अशा ठिकाणी देऊ नये.
- अमोल पुरी, पोलीस निरीक्षक (सायबर सेल)