यवतमाळ : यवतमाळ : निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पूर्ण क्षमतेने काम करता यावे, शासकीय कामाची रूपरेषा कळावी यासाठी येथे नगरसेवकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता जिल्ह्यातील दहा नगर पालिकेच्या २५० नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले. मात्र केवळ ४० नगरसेकवकांनी उपस्थिती दर्शविली. नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज कसे चालवावे याचे ज्ञान राहात नाही. केवळ पाच टक्केच ठराविक सदस्य सातत्याने सभागृहातील बैठकांमध्ये बोलताना दिसतात. त्यातही महिलांचा सहभाग हा नगण्यच असतो. वेळेवर उपस्थित होणाऱ्या विषयावर चर्चा कशी घडवून आणायची, विविध स्वरूपाच्या कंत्राटाला मंजुरी देताना कुठल्या बाबी पडताळ्याव्या, पालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदीची पुसटशी कल्पनासुध्दा अनेक सदस्यांना राहात नाही. केवळ मुख्याधिकारी आणि अभियंत्यांच्या भरवशावर नगरपरिषदेचा कारभार सुरू असतो. नगरसेवकांचे अधिकार त्यांना अवगत नसल्याने अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या अनेक ठरावांना सहमती मिळविली जाते. एकंदरच शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, खऱ्या अर्थाने पंचायत राज व्यवस्था बळकट व्हावी, स्वायत्त संस्थेचे अधिकार प्रभाविपणे वापरून आपल्या शहराला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवण्यासाठीच नगरसेवकांनी कायदेशीरदृष्ट्या सजग असणे आवश्यक आहे. दुर्देवाने शासनाच्या या प्रयत्नाला नगरसेवकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे सोमवारी झालेल्या कार्यशाळेतील उपस्थितीवरून दिसून आले. नगर विकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या सहकार्याने विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईच्या माध्यमातून ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, विविध प्रकल्पांची अंमलबजावणी कशी करायची, कामाजाची आखणी कशी करायची, शहर स्वच्छता आराखडा कसा आखायचा आदीबाबतची या प्रशिक्षणात माहिती दिली जात आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण नगरसेवकांसाठी असताना केवळ ४० नगरसेवक प्रशिक्षणाला हजर होत्या. काही नगराध्यक्षांचीही यावेळी अनुपस्थिती होती. (शहर वार्ताहर)
क्षमता बांधणी प्रशिक्षणाला केवळ ४० नगरसेवक उपस्थित
By admin | Published: February 24, 2015 12:50 AM