पांढरकवडा : तालुक्यातील एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्येच्या रक्षणासह कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पांढरकवडा पोलीस ठाण्यात केवळ ६३ पोलीस कार्यरत आहेत. त्यांच्यावर ११८ गावांची जबाबदारी आहे. ठाण्याचे कार्यक्षेत्र आणि घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. बंदोबस्ताच्या काळात तर पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी केली जात आहे.
पांढरकवडा तालुक्यात १९२२ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट समाविष्ट करण्यात आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव ठाणे आहे. पांढरकवडा तालुका आणि शहर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंदविला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना नेहमी सज्ज रहावे लागते. परंतु पांढरकवडा पोलीस ठाण्यात शिपायांची पदे रिक्त आहे. येथे ९७ पदे मंजूर असताना केवळ ६३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील चार ते पाचजण साप्ताहिक रजेवर, तर चार ते पाचजण किरकोळ कारणाने सुट्टीवर असतात. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्या आहे. ठाण्याअंतर्गत ११८ गाव असून, पांढरकवडा ते अर्ली ४८ किलोमीटर तेलंगणा सीमेपर्यंत एका टोकाला, तर पांढरकवडा ते मोहदा २८ किलोमीटर दुसऱ्या टोकाला इतक्या किलोमीटरचा विस्तार आहे. त्यामुळे काही अनुचित घटना घडल्यास त्याठिकाणी पोलिसांना पोहोचण्यास विलंब होतो. नागरिकांमध्ये पोलिसांप्रति असंतोष दिसून येतो. तेलंगणा सीमा, राष्ट्रीय महामार्ग तर दूरपर्यंत असलेले पोलिसांचे कार्यक्षेत्र यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. अत्यल्प पोलीस बळाच्या भरवशावर सर्वत्र लक्ष ठेवण्याची मोठी कसरत दिसून येते. या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे ही पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची रिक्त आहे. परिणामी कामाचा ताण घेऊन पोलिसांना ड्यूटी करावी लागत आहे. पोलिसांसाठी अत्याधुनिक वाहन महत्त्वाचे असते. मात्र पांढरकवडा पोलीस ठाण्यात सध्या असलेले वाहने अतिशय खराब परिस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या प्रदीर्घ किलोमीटरपर्यंत विस्तार असलेल्या या पोलीस ठाण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे कसे, असा प्रश्न पोलिसांना नेहमी भेडसावत असतो. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून मोहदा येथे पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव असून, तोही प्रलंबितच आहे.
बॉक्स : नक्षल भत्त्यापासून पोलीस शिपाई वंचित
पांढरकवडा तालुक्यात कार्यरत पोलीस शिपाई हे २०१७ पासून नक्षलग्रस्त भत्त्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हा नक्षलग्रस्त भत्ता मिळत आहे. परंतु येथील पोलीस शिपाई यापासून वंचित आहेत. तसेच पोलीस शिपायांच्या कमतरतेमुळे येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाकडे व त्यांच्या आरोग्याकडे होत असून, लक्ष देण्यात अडचणी येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.