लक्ष्मीचे सोने गहाण : बियाणे, खतासाठी धावपळ झाली सुरूपाटणबोरी : कृषी केंद्र संचालकांनी शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले असले, तरी शेतकर्यांकडे बियाणे खरेदीसाठी पैसा नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. गतवर्षी कमी झालेले कापसाचे उत्पादन, त्याला मिळालेला कमी दर, बियाणे व महागडी औषधी, रासायनिक खतावरील खर्च, या सर्वांंंच्या वजा-बाकीत शेतकर्यांना हाती काहीच उरले नाही. गेल्यावर्षी ‘मक्त्या’ने शेती कसणार्यांना तर आपल्या मेहनतीचा मोबदलासुध्दा मिळाला नाही. या परिस्थितीत येत्या पावसाळ्यात पेरणी कशी करायची, पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांना घरातील लक्ष्मीचे सोने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. काही शेतकरी सावकारांकडे शेती ‘रजिस्ट्री’ करून व्याजाने पैसे उचलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गतवर्षी उधार देणार्या कृषी केंद्र संचालक व दलालांनी यावर्षी आपले हात आवरलेले आहेत. परिणामी शेतकर्यांना आता उधारीत बियाणे, खत मिळणे कठीण झाले आहे. यावर्षी अनेक नवीन बियाणे कंपन्या व वाणांचा अक्षरश: पूर आल्याने कोणते बियाणे पेरावे, याबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी मक्त्याने शेती कसणार्या शेतकर्यांची संख्या यावर्षी कमी झाल्याने शेतीचा मक्ताही घटला आहे. तीन-चार वर्षांंंच्या नापिकीने त्रस्त अनेक शेतकर्यांनी शेती विकायलाही काढली आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने अनेक शेतकर्यांना नाईलाजाने शेती कसावी लागत आहे. बियाणे, औषधी, रासायनिक खते यांच्या गगनाला भिडणार्या किमती, सालदारांचे वाढणारे साल (पगार), बैलांच्या वाढलेल्या किंमती, तसेच नापिकीमुळे शेतकरी दृष्टचक्रात सापडले आहे. त्यांना पेरणीसाठी आर्थिक तजवीज करताना प्रचंड त्रास होत आहे. घरातील लक्ष्मीचे सोने गहाण ठेवून काही शेतकरी बियाणे, खते खरेदी करीत आहे. अल्पभूधारक शेतकर्यांकडे गहाण ठेवण्यासाठीही घरात काहीच नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. (वार्ताहर)
अवघे शेतकरी झाले चिंतातूर
By admin | Published: June 06, 2014 12:14 AM