लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असताना पाचच तालुके यात समाविष्ट झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे.राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ एप्रिल रोजी घोषित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित केला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदूआर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकस्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून पाच तालुके मध्यम दुष्काळी घोषित करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. दुष्काळ घोषित झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती केवळ या सहा तालुक्यांनाच मिळणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ६७.४५ टक्के पाऊस झाला. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा जास्त घटले. अपुºया पावसाने सोयाबीन हातीच लागले नाही. अशीच स्थिती इतर पिकांची आहे. बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. तूर खरेदीचे भिजत घोंगडे अद्यापही सुरूच आहे. अशा स्थितीत जिल्हा दुष्काळी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार केवळ पाच तालुक्यांचा मध्यम दुष्काळात समावेश केला. जिल्ह्यातील ११ तालुक्यांना यातून वगळल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तालुक्यातही दुष्काळीस्थिती असताना कोणत्या निकषावर या तालुक्यांना वगळले, असा सवाल आहे.शासन निर्णयात शब्दांचा खेळराज्य शासनाने दुष्काळ घोषित करताना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असा शब्दप्रयोग शासन निर्णयात केला. आजपर्यंत दुष्काळसदृश्य आणि दुष्काळ असेच शब्द वापरले जायचे. परंतु प्रथमच मध्यम दुष्काळाचा शोध शासनाने लावला आहे. मध्यम दुष्काळ आणि दुष्काळ यात नेमके कोणते अंतर आहे, हे मात्र निणर्यात अधोरेखित केले नाही.
केवळ पाच तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:22 PM
अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला.
ठळक मुद्देनिर्णय : राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर व यवतमाळचा समावेश