हिवरी : हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव आणि लगतच्या शिवारातील वनजमिनीवरील दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून त्याची तस्करी करण्यात आली. सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हा लाकूडसाठा असल्याचा अंदाज वनवर्तुळातूनच व्यक्त करण्यात आला होता. मात्र चौकशीत वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी हा लाकूडसाठा केवळ एक लाख ४६ हजार २९ रुपयांचा असल्याचे रेकॉर्डवर दर्शविण्यात आले. त्यावरून दक्षता पथकाच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सुमारे महिनाभरापूर्वी हिवरी वनपरिक्षेत्रातील मनदेव, मनपूर आणि लगतच्या शिवारात तस्करांनी दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालविली. ही कुऱ्हाड चालवित असताना पोकळ वृक्षांना अर्धवट टाकून सोडून देण्यात आले. त्यामुळे आता या वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शिवाय ज्या वृक्षांची कत्तल करण्यात आली ती ३० ते ३५ फूट उंचीची होती. शंभर सेंटीमीटरवरील गोलाई असलेले खोडच तस्करांनी ट्रकद्वारे लंपास केले. घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाने वृक्ष कत्तलीची मोक्का पाहणी केली. त्यामध्ये सुमारे ४० लाख रुपये किमतीचा ५० घनमीटर लाकूडसाठा तस्करी करण्यात आला असावा, असा अंदाज वनविभागानेच वर्तविला होता. मात्र आता वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी तस्करी झालेला हा सागवान लाकूडसाठा केवळ एक लाख ४६ हजार २९ रुपये किमतीचा असल्याचा नवाच जावईशोध लावण्यात आला आहे. हा शोध लावताना मनदेव शिवारातील कक्ष क्र.४९७ आणि अर्जुना येथील कक्ष क्र. ४९६ मधीलच लाकूडसाठा तस्करी झाल्याचे रेकॉर्ड तयार करण्यात आले. वास्तविक किन्ही आणि अन्य काही शिवारातील वनजमिनीवरील लाकूडसाठाही तस्करी झाला आहे, हे विशेष. त्यावरून वनविभागाच्या दक्षता पथकाच्या चौकशीवर खुद्द वनविभागातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
तस्करीतील २०० वर वृक्ष केवळ दीड लाखांचे
By admin | Published: July 21, 2014 12:23 AM