हंसराज अहीर : वणी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप वणी : शेतकरी हा देशाचा कणा आहे. तो कष्ट करून काळ्या मातीत धान्य पिकवतो. शेतकऱ्यांचा दर्जा सुधारला, तर देश आपोआपच सुधारेल, असे उद्गार केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात काढले. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ८ एप्रिलला सुरू झालेल्या प्रदर्शनाचा गुरूवारी समारोप झाला. पाच दिवसाच्या कालावधीत ८० हजार शेतकरी व व्यक्तींनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. ना.हंसराज अहीर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार प्रा.राजू तोडसाम, आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, वेकोलिचे महाप्रबंधक आर.के.सिंग, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी राजीव खिरडे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कृषी प्रदर्शनाच्या यशस्वीतेबाबत समाधान व्यक्त केले. उत्कृष्ट शेती करणाऱ्या तसेच जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर भेट देणाऱ्या शेतकऱ्यांमधून सोडत काढून पाच शेतकऱ्यांना विविध शेती अवजारे व यंत्रे बक्षिस देण्यात आली. शेती व्यवसाय दिवसेंदिवस फायदेशीर ठरत आहे. भविष्यात पंजाबप्रमाणे महाराष्ट्रीयन शेतकरीही वर्षातून तीन पिके घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी शेती विकू नका, असा सल्ला अहीर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन संशोधनाकडे वळावे, असेही त्यांनी आवाहन केले. आज आपला देश शेतकऱ्यांच्या अपार कष्टामुळे अन्नधान्यातून स्वयंपूर्ण होत असल्याबाबत अहीर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. डॉ.महेंद्र लोढा यांनी आभार मानले. प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
कष्टकरी शेतकरी सुधारला तरच देश सुधारेल!
By admin | Published: April 15, 2017 12:20 AM