यवतमाळ : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून पाच तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेती खरडून गेल्याने पुढील काही वर्षे उत्पन्न निघणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मोठा महाप्रलयच आला आहे. अशाही स्थितीत स्थानिक आमदार, खासदार जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले नाहीत. दहा पैकी केवळ तीन आमदारांनीपूरग्रस्तांची भेट घेतली. तर इतर आमदारांनी केवळ फोनवरूनच सोपस्कार पूर्ण केला. त्यांना जनतेच्या दु:खापेक्षा राज्यातील राजकीय घडामोडीत अधिक रस असल्याने मुंबईतच ठाण मांडून आहेत.
जिल्ह्याला तीन खासदार आहे. यातील दोन खासदारांनी पाठ फिरविली आहे. भावना गवळी दीड वर्षापासून यवतमाळात फिरकल्याच नाहीत. खासदार हरविल्याचे फलकही लागले, तक्रारी झाल्या. पूरस्थितीतही त्यांना मतदारसंघाची आठवण झाली नाही. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत पूरबाधित क्षेत्रात मोठा असंतोष व्यक्त होत आहे. अडचणीच्या काळात जिल्ह्याला पालकमंत्री नसता येथील आमदारांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन करणे अपेक्षित होते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
तीन हजार २३८ नागरिकांना हलविले
पूरस्थितीमुळे धोका निर्माण झालेल्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जवळपास तीन हजार २३८ नागरिकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे.
अतिपावसाने दीड लाख हेक्टरवरील पीक झाले नष्ट
पावसाने हाहाकार उडाला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमीन खरडून गेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक लाख ५० हजार ८०५ हेक्टर पिकाचे नुकसान झाले.
पाच तालुक्यांमध्ये स्थिती झाली गंभीर
पाऊस व पुराच्या तडाख्याने पाच तालुक्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे. राळेगाव, मारेगाव, कळंब, बाभूळगाव, वणी या तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे.
१५६ गावांमध्ये पुराचे थैमान
जिल्ह्यातील १५६ गावांमध्ये नदी, नाल्यांंच्या पुरामुळे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.
शेतकरी संकटात... खासदारांचाही पत्ता नाही
पूरस्थितीमुळे सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांची घरे कोसळली आहेत. जीव वाचविण्याची धडपड सुरू आहे. अशा स्थितीत येथील यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी आणि उमरखेड-हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे ऑनफिल्ड दिसलेच नाहीत. त्यांच्याकडून स्थानिक यंत्रणेला पूरस्थितीबाबत साधी विचारणाही झाली नाही. हे खासदार आपल्या राजकीय घडामोडीतच दिल्लीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. जनतेच्या मतावर खासदार झालेल्यांना संकटात असलेल्या मतदारांची आठवण आली नसल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. केळापूर-चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळासाहेब धानोरकर यांनी चंद्रपूर व वणी येथील पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तसेच प्रशासनाकडून आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्याची माहिती आहे.
आमदार साहेब कुठे?
संजीवरेड्डी बोदुकरवार
वणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण होताच मदत कार्य पोहोचविण्यासाठी आमदार तत्काळ ऑनफिल्ड आले. यंत्रणेला वेळोवेळी सूचनाही दिल्या.
अशोक उईके
पूर आला असताना बाधित गावात भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. प्रशासनाची मदत तत्काळ कशी पोहोचेल याचाही आढावा घेतला.
नामदेव ससाने
उमरखेडमध्ये २९ हजार हेक्टर शेतीचे व ३५० घरांचे अंशत: नुकसान झाले. याचा आढावा घेण्यासाठी आमदार ससाने ऑनफिल्ड दिसून आले.
संदीप धुर्वे
केळापूर विधानसभेतील आर्णी तालुक्यात २७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. आमदार धुर्वे यांनी आर्णी पंचायत समितीमध्ये आढावा घेतला.
मदन येरावार
यवतमाळात शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना शहरात घडली. तालुक्यातील शेतीचेही नुकसान झाले. याचा आढावा फोनवर घेतला.
संजय राठोड
दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये पावसाने शेतीचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. याची स्थिती मुंबईतून फोनवर घेत, अहवाल मागितला.
इंद्रनील नाईक
पुसदमध्ये पुराचा फटका नसला तरी शेतीचे नुकसान झाले आहे. ही स्थिती मुंबईत राहून आमदारांनी फोनवरच जाणून घेतली.
नीलय नाईक
जवळपास २०० हेक्टर शेतीचे नुकसान आहे. काही घरे बाधित झाली. याचा आढावा फोनवर घेतला आहे.
वजाहत मिर्झा
फोन करून पाऊस पाण्याची काय अवस्था आहे, याची माहिती घेत आमदार वजाहत मिर्झा यांनी सोपस्कार पार पाडला.
दुष्यंत चतुर्वेदी
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आल्यापासून चतुर्वेदी यवतमाळात दिसलेच नाहीत. पूरस्थिती त्यांना माहितीही नाही.