रत्नागिरीचे दीक्षित रुजूच झाले नाही : पुन्हा अतिरिक्त प्रभार, क्रीडा विकासाला खीळ यवतमाळ : तब्बल तीन वर्षांनंतर यवतमाळ जिल्ह्याला पूर्णवेळ क्रीडा अधिकारी म्हणून रत्नागिरीचे मिलिंद दीक्षित मिळाले. त्यांची प्रशासकीय बदली यवतमाळला झाली. मात्र नियमबाह्य बदलीचे कारण देत ते येथे रुजू न झाल्याने जिल्हा क्रीडा कार्यालय पुन्हा एकदा प्रभारावरच आले आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरचे तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात क्रीडा अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. आॅगस्ट २०१३ पासून जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी नाही. अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. ३० जून २०१६ रोजी त्यांची समकक्ष पदावर नागपूर येथे बदली झाली. दरम्यान, रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांचीही यवतमाळ येथे बदली झाली. तब्बल तीन वर्षांनंतर पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी मिळत असल्याने जिल्ह्यात खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते. बदलीनंतर सात दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा आदेश होता. मात्र दीक्षितसह अनेक क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी सदर प्रशासकीय बदली नियमाला धरून नसल्याचे कारण देत या बदलीला आव्हान दिले. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला ज्येष्ठ क्रीडा अधिकारी वा जिल्ह्यात एकही तालुका क्रीडा अधिकारी नसल्याने अचलपूरचे तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांच्याकडे यवतमाळ क्रीडा अधिकारी पदाचा प्रभार सोपविला आहे. तीन वर्षांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रभारावरच असल्याने जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला खीळ बसली आहे. शासनाने त्वरित पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी द्यावा, अशी मागणी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
अचलपूरहून चालतो जिल्हा क्रीडा विभागाचा कारभार
By admin | Published: July 22, 2016 2:18 AM