भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : पुणे येथे होणार शिक्षण पूर्णयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली जाणार असून पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. भारतीय जैन संघटना गत दोन दशकांपासून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात कार्य करीत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुणे येथील वाघोली परिसरात सुसज्ज शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गतच जिल्ह्यातील ५० मुलांची निवड करून त्यांना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात सन २०१४ आणि २०१५ या वर्षात वडील किंवा आजोबाने आत्महत्या केली, अशा कुटुंबातील मुलामुलींची निवड केली जाणार आहे. या मुलामुलींना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पासोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. येथे या मुलांच्या राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे, शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आल्हाददायक वातावरणात शिक्षण पूर्ण होणार आहे. आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, पृथ्वी वंदन, गांधी चौक, यवतमाळ (०७२३२-२४३११९, २४५११९) येथे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी शिक्षणाची संधी
By admin | Published: January 03, 2016 2:57 AM