नगरपंचायत अध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी काँग्रेसला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 10:45 AM2022-02-08T10:45:27+5:302022-02-08T10:51:36+5:30
नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वतंत्र ताकद आजमावली. त्यामध्ये काँग्रेसला राळेगाव येथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उर्वरित पाच ठिकाणी मात्र मित्र पक्षांची गरज भासणार आहे. तरच चार नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येत आपल्या पदरात सत्तेचा वाटा अधिकचा कसा मिळेल याची वाटाघाटी करीत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गेम चेंजची व्यूहरचना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आखली जात आहे.
नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. राळेगाव येथे ११ सदस्य असल्याने स्पष्टपणे काँग्रेसची सत्ता येणार आहे. आता तेथे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत भागीदारी देते का याकडे लक्ष लागले आहे. कळंब येथे शिवसेनेच्या मदतीशिवाय काँग्रेसचे गणित पूर्ण होत नाही. अशीच स्थिती महागाव येथील आहे.
मारेगाव, झरीमध्येही काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादीची साथ लाभणार आहे. तर ,बाभूळगाव येथे शिवसेना मोठा पक्ष असून तेथे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय शिवसेनेला स्थिर सत्ता स्थापन करता येणार नाही. सर्वच ठिकाणी जोडतोडचे गणित आहे. मात्र तरीही जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये मोठे संख्याबळ असलेला पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत राहणार हे निश्चित मानले जात आहे. वाटाघाटी करताना शिवसेना, राष्ट्रवादीला थेट काँग्रेस सोबतच बोलणी करावी लागणार आहे. यात प्रत्येक नगरपंचायतनिहाय समीकरणावरून आपले पारडे कसे जड राहील याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादीकडून सुरू आहे.
मुत्सद्देगिरीत राष्ट्रवादी नेहमीच वरचढ
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठल्याही सत्ता स्थापनेच्या समीकरणात राष्ट्रवादी नेहमीच आक्रमक राहिली आहे. संख्याबळ कमी असले तरी महत्त्वाची पदे पदरात पाडण्याचा कायम प्रयत्न केला जातो. असे प्रयोग यापूर्वी नगरपरिषद, जिल्हा परिषदेत यशस्वी झाले आहे. आताही नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ नाही. पूर्ण जिल्ह्यात चारच सदस्य आहे. या चारवरही शेवटच्या क्षणापर्यंत पद मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संधान साधण्याची व्यूहरचना आखली जात आहे.