यवतमाळ : प्रेक्षकांच्या चिक्कार गर्दीत तब्बल तीन तास रंगलेल्या व अत्यंत चुरशीच्या झालेल्या अखिल भारतीय व्हॉलीबॉल सामन्यात विदर्भातील मातब्बर ऑरेंज सिटी नागपूर संघाने छत्रपती शिवाजी महाराज चषक पटकावला. साई गुजरात संघाचा पराभव करून नागपूर संघाने हा विजय मिळविला.
यवतमाळ येथील श्री शिवाजी क्रीडा मित्र मंडळाच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समता मैदानावर १० ते १२ फेब्रुवारीपर्यंत अखिल भारतीय छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेचे आयोजन केले होते. यात देशातील १४ नामांकित संघातील ३५० खेळाडू सहभागी झाले होते.
रविवारी रात्री ९ वाजता नागपूर विरुद्ध गुजरात संघादरम्यान झालेला अंतिम सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. नागपूर संघाने पहिला सेट २५-१४ असा दिमाखात जिंकल्यानंतर गुजरात संघाने सांघिक खेळी करीत दुसरा सेट २५-१५ जिंकून १-१ अशी बरोबरी केली. तिसरा सेट अत्यंत उत्कंठावर्धक झाला. नागपूर संघ १५-११ अशा चार गुणांनी आघाडीवर असताना गुजरात संघाने पुनरागमन करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर २२ ते ३१ गुणांपर्यंत उभय संघ बरोबरीत येत होते. अखेर गुजरात संघाने बाजी मारून ३३-३१ अशा दोन गुणांनी जिंकून सामन्यात २ विरुद्ध १ सेटने आघाडी घेतली.
चवथ्या सेटमध्ये नागपूर संघाने पुन्हा एकदा पुनरागमन करीत २५ विरुद्ध २० गुणांनी सेट जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पाचव्या निर्णायक सेटमध्ये नागपूरचा लिब्रो रोहित शेळके, योगेश राव, आसिफ बानवा, केवल बराई, कृणाल भांगे, वलय चरडे, राहुल पोतराजे यांनी आक्रमक खेळ करीत १५-७ अशा गुणांनी विजय मिळवून देत संघाला विजेतेपद पटकावून दिले. गुजरात संघातर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू कार्तिक शर्मा, विशाल चित्राला यांनी चांगली खेळी केली.
तत्पूर्वी गुजरात संघाने दुसऱ्या एलिमिनेट राउंडमध्ये पंजाब संघावर २२-२५, २५-१८, २५-९, १४-२५, १५-७ अशा गुणांनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विजेत्या नागपूर संघाला एक लाख रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या गुजरात संघाला ७० हजार रुपये रोख व चषक, तृतीय पंजाब पोलिस संघाला ५० हजार रुपये रोख व चषक, चतुर्थ इन्कम टॅक्स चेन्नई संघाला ३० हजार रुपये रोख व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
जिहान मालिक बेस्ट सेटर
या सामन्यात बेस्ट सेटर जिहान मालिक (गुजरात), बेस्ट ब्लॉकर कार्तिक शर्मा (गुजरात), बेस्ट अटॅकर गगन दीप सिंग (पंजाब), बेस्ट लिब्रो शक्तिकुमार (चेन्नई) ठरला. मॅन ऑफ द टुर्नामेंटचा बहुमान योगेश राव (नागपूर) यांना मिळाला. सामन्याचे धावते समालोचन प्रशांत म्हस्के यांनी केले.
बक्षीस वितरण
बक्षीस वितरण माजीमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झाले. यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, क्रीडा उपसंचालक विजय संतान, वसंत घुइखेड़कर, डॉ. विनोद भोंगाड़े, कृष्णा कडू, संजय चिद्दरवार, अतुल नेवारे, शहबाज खान, गोगरे, प्रशांत वानखडे आदी उपस्थित होते. संचालन कैलास राउत, आभार चंद्रशेखर आगलावे यांनी मानले.