फोटो
बिटरगाव .... शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूची चाहूल लागली आहे. बदलत्या वातावरणात सकाळची हुडहुडणारी थंडी आणि दुपारच्या उन्हाचा त्रास सुरू झाला आहे. मात्र, उमरखेड तालुक्याच्या बंदी भागात निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्याने पळसाच्या कोवळ्या फुलांनी डोंगरकडा केशरी झाल्या आहे. त्यामुळे या परिसरातील मानव अल्हादीत झाले आहे.
माणसाला शरीराच्या वेदना सहन करताना प्रत्येक ऋतूचा आनंद घेण्यात एक वेगळीच धन्यता वाटते. त्यामुळेच वेगवेगळ्या ऋतूचा आनंद आणि त्यातील सण, उत्साहात साजरे केले जातात. पैनगंगा अभयारण्यात सध्या पळसाची केशरी रंगाची फुले, पाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. रंगपंचमीची चाहूल व शिमगा या सणाची आठवण ही फुले करून देत आहे. मुक्तहस्तांनी रंगाची उधळण करून वैशाखी पौर्णिमेच्या जणू चांदण्यात पळस आपला केसरी, लाल रंग निसर्गाच्या नयन रूपात ओसांडून वाहत आहे. पळस फुले वर्षातून एकदा तरी मानवी मनावर अधिराज्य करून जाते. पूर्वी धूलिवंदन सण आला की, एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचा रोग नाहीसा होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे.
पळसाच्या पानांचाही औषधांसाठी वापर केला जातो. अशा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. लाल, केसरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरुंचे लक्ष वेधून घेत आहेत.
शिशिराची थंडी ओसरायला लागली की पानझडीने उघडी पडलेली वृक्ष राजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागते. तेथूनच वसंताची चाहूल लागते. या वसंतात रंगाची उधळण करणारा रंगोत्सव सुरू होतो. शिशिरात बोडख्या झालेल्या शेताला केसरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळते. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यासारखी दिसतात. १५ ते २५ फूट उंच असणाऱ्या पळसाची फुले अनेक ठिकाणी पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात.
पूर्वी ग्रामीण भागात पळस पानांपासून मोठ्या प्रमाणात द्रोण आणि पत्रावळी बनवल्या जात असे. आता काळ बदलला, तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पळस डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. त्याचे खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात. पाने आकाराने मोठी असतात. सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलाचे धुमारे फुटतात . सध्या पळसाची झाडे लाल, केसरी आणि पिवळ्या अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली आहे.
बॉक्स
पैनगंगा अभयारण्यात रंगाची उधळण
पूर्वी धूलिवंदनात एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून त्याचा वापर होत असे. असा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या या कवळ्या लुसलुशीत फुलांनी बहरला आहे. बंदी भागातील बिटरगाव, ढाणकी लगतच्या पैनगंगा अभयारण्यात रंगीबेरंगी फुलांनी पळस नटलेला दिसत आहे.