यवतमाळ : व्यापाऱ्याने दाखल केलेल्या प्रकरणात दारव्हा पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या पोलीस ठाण्याच्या सहा जणांवर कारवाई करावी, असे न्यायदंडाधिकारी केतनकुमार तेलगावकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दारव्हा येथील खाटिकपुरा भागातील पान मसाला विक्रेते मो. इमरान मो. शफी जखुरा यांचे घर आणि गोदामात १६ मे २०१६ रोजी दारव्हा पोलिसांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी सात लाख रुपये नेले. जप्तीमध्ये प्रत्यक्षात तीन लाख १५ हजार रुपये दाखविण्यात आले. उर्वरित रक्कम पोलिसांनी हडप केल्याची तक्रार मो. इमरान यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे मो. इमरान यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केतनकुमार तेलगावकर यांच्या न्यायालयात सदर प्रकरणावर सुनावणी झाली. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा सहा जणांवर भादंविच्या कलम ३७९, ३८० आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा आदेश २० आॅगस्ट रोजी दिला आहे. याप्रकरणात मो. इमरान यांची बाजू अॅड. टी.एम. खान यांनी मांडली. (वार्ताहर)
दारव्हा पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश
By admin | Published: August 27, 2016 12:45 AM