दिग्रस : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन २१ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे. या महायज्ञासाठी जय्यत तयारी असून भव्य मंडप उभारला जात आहे. पोहरादेवी येथील जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिरालगतच्या शंभर एकर जमिनीवर २० हजार फुटाचे १६ तर दोनही मुख्य मंदिरासमोर पाच हजार फुटाचे दोन भव्य सभामंडप निर्मिती केली जात आहे. याच परिसरामध्ये एका प्रमुख व्यासपीठावर जगदंबा मातेची मूर्ती, तपस्वी रामराव महाराजांचे आसन आणि निमंत्रितांची बैठक व्यवस्था राहणार आहे. या यज्ञात एकाच वेळी पाच हजार नागरिक यज्ञाला बसणार आहे. ४५० ब्राम्हण होमकुंडाजवळ राहतील. ब्रम्हवृंदांच्या निवास व भोजनाची वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. तर निमंत्रित आणि येणाऱ्या भक्त मंडळींची व्यवस्था वेगळी राहणार आहे. होमहवन सामुग्री ठेवण्याचे व भोजन सामुग्रीचे वेगवेगळे भांडारगृह आहे. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी १०० सिक्युरीटी एजंसीजना पाचारण करण्यात आले आहे. फिरते शौचालय शेगाव येथून मागविण्यात येणार आहे. होमहवनासह हजारो अनुयायी बंजारा समाजाची पोथी, पारायण करणार आहे. बलदेव महाराज विद्यालयाकडून संगणक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात येणार आहे. हजारो भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी बांधण्यात आली असून विजेची व्यवस्थाही राहणार आहे. या लक्षचंडी यज्ञासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखिल भारतीय बंजारा शक्तीपीठाच्यावतीने आमंत्रण देण्यात आले असून केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत त्यांची भेट घेतली. यशस्वीतेसाठी संत रामराव महाराज व बाबूसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनात परिश्रम घेतले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
पोहरादेवी येथे लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन
By admin | Published: March 13, 2017 1:02 AM