आठवे वर्ष : विविध संघटना व मंडळांचा पुढाकारदारव्हा : अंबिकानगरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आर.के. कांबळे यांच्या अध्यक्षतेत ११ ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. आंबेडकर रौप्य महोत्सवी आठवे समतापर्व घेण्यात येत आहे. ११ एप्रिल रोजी समतापर्वाचे उद्घाटन सम्राट अशोक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तसेच समतापर्वाचे अध्यक्ष आर.के. कांबळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष अशोक चिरडे, उपाध्यक्ष माधुरी गडपायले, नगरसेवक भूषण सरदार यांच्या प्रमुख उपस्थित होईल. यावेळी महात्मा जोतिबा फुले यांची जयंतीही साजरी करण्यात येईल. १२ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता भारतीय संविधान या विषयावर जाहीर व्याख्यान होईल. यवतमाळ येथील प्रा. सुभाष कुळसंगे व प्रा.सुनील चकवे हे व्याख्यानकर्ते राहतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती प्रा.सुषमा गावंडे राहील. १३ एप्रिलला सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायिका सुमन चोपडे आणि त्यांचा संच सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मजागृती अभियानाच्या जिल्हाध्यक्ष कमल बोडखे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका समता सैनिक दलाचे अध्यक्ष प्राचार्य सदानंद मनवर हे राहतील. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येईल. त्यामध्ये सकाळी १०.३० वाजता आर.के. कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी भीमाई व रमाई महिला मंडळाच्यावतीने बुद्धवंदना घेण्यात येईल. त्यानंतर चंद्रपूर येथील महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक खंदारे यांचे जाहीर व्याख्यान होईल. या कार्यक्रमाला महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आर.के. कांबळे, अमोल राठोड, नागपूर दीक्षाभूमीच्या सदस्य अनू गडपायले, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले यांची उपस्थिती राहील. सायंकाळी सम्राट अशोक बुद्ध विहार ते पंचशीलनगर अशी मिरवणूक काढण्यात येईल. नागरिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आर.के. कांबळे, बापुराव तायडे, शिवाजीराव खडसे, भीमराव वरघट, ऋषीकेश मनवर, आर.एन. हडसे, निरंजन पेठे, गौतम मनवर, अॅड.रामराव मनवर, देवीदास बोडखे, साहेबराव कांबळे, पुष्पा मनवर, रजनी खिराडे, पी.एफ. गांजरे, सिद्धार्थ गडपायले आदींनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हा येथे समतापर्वाचे आयोजन
By admin | Published: April 11, 2016 2:39 AM