राजेश्वर बोलधन : कुक्कुट पालनाचा प्रयोगही यशस्वी, सुधारित तंत्रज्ञानाची जोड मांगलादेवी : ‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील प्रारब्धवाद या अध्यायातील ओवीप्रमाणे गरजेतून युक्तीचा जन्म होवून प्रसंगानुरूप मनुष्यात शक्ती वाढत असते. प्रयत्नाची पेरणी केल्यास त्याला इच्छारूपी फळे प्राप्त होतात. असाच एक शेतकरी ज्याने मेहनत व जिद्दीने परिश्रमाच्या भरवशावर शेती व्यवसायाला सन्मान प्राप्त करून दिला आहे. हा प्रयोगशील व धडपड्या शेतकरी म्हणजे नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील ज्ञानेश्वर बोलधन होय. शेतीने हरविल्यानंतर अनेक शेतकरी विषाचा घोट घेतात. कर्जबाजारी व नापिकीच्या संकटापुढे हतबल होवून गळफास घेतात. परंतु राजेश्वरने शेतीलाच सर्वस्व मानले. सुधारित तंत्रज्ञानाची जोड देवून शेतीत उत्पन्नाचे नवीनवीन स्रोत तो शोधू लागला. कठीण परिस्थितीवर मात केली तरच यश पदरी पडते याची खूनगाठ बांधून या शेतकऱ्याने मेहनत व परिश्रमाने शेतीतच नंदनवन फुलविले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाने या दोनही बाबींच्या पूर्ततेसाठी प्राधान्य दिले आहे. शेतातील विहिरीत पाणी असूनही भारनियमनामुळे शेतकरी ओलित करू शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीज उपलब्ध करून देण्याचे कार्य शासन करीत आहे. मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती होत नसल्याने अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर अधिक भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विद्युत कंपनीने शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप पुरवठ्याची योजना आणली. अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. त्यातीलच राजेश्वर बोलधनसुद्धा सौर कृषी पंपाद्वारे शेतात ओलित करीत आहे. तसेच त्याने शेतामध्ये जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. यातूनही तो परिसरात क्रमांक एकचे उत्पन्न घेत आहे. शेतकऱ्याने निराश न होता नवनवे प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे, असे तो सांगतो. राजेश्वर बोलधन हा आज मांगलादेवी परिसरामध्ये प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. (वार्ताहर)
मांगलादेवीच्या शेतकऱ्याचे सौर ऊर्जेवर ओलित
By admin | Published: February 08, 2017 12:25 AM