यवतमाळ : नॅक मूल्यांकन टाळणाऱ्या महाविद्यालयावर प्रवेश बंदीचे संकट घोंगावत आहे. अशा महाविद्यालयांमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला असून याबाबत खुद्द प्राचार्यांनीच उच्च शिक्षण सहसंचालकांपुढे पोलखोल केली. त्यामुळे सहसंचालकांनी आता विद्यापीठ यंत्रणेलाच धारेवर धरत या महाविद्यालयांचा अहवाल मागविला आहे.
पदवीच्या पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रत्येक महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेण्याचा आदेश आहे. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही महाविद्यालयांना निर्देश दिले. त्यानंतरही जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांनी मूल्यांकन टाळल्याची बाब पुढे आल्यानंतर या विद्यापीठाने या महाविद्यालयांना पहिल्या वर्षाचे प्रवेश न घेण्याचे आदेश दिले.
त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण वर्तृळात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, अशा महाविद्यालयांचे मत जाणून घेण्यासाठी १९ जून रोजी अमरावती येथे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात सभा घेण्यात आली. त्यात प्राचार्य आणि नॅक समन्वयकांचीही उपस्थिती होती. परंतु, यावेळी अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी वेगळीच भूमिका मांडली. नॅक मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आमच्या महाविद्यालयात नाही, तर मग नॅक मूल्यांकन कसे करायचे, हा प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला. महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण नसणे, पुरेशी जागा नसणे, मुलींकरिता काॅमन रूम नाही, पाण्याची सुविधा नाही, विद्युत सुविधा नाही आदी अडचणी या प्राचार्यांनी लेखी स्वरुपात मांडल्या.
याबाबत उच्च शिक्षण सहसंचालकांनी गंभीर दखल घेत विद्यापीठ यंत्रणेलाच फैलावर घेतले आहे. संबंधित महाविद्यालयांना विद्यापीठ संलग्नता देताना संबंधित सुविधा तेथे आहेत की नाही, याची तपासणी विद्यापीठामार्फत केली जाते. असे असताना २० वर्षांपासून सुरू असलेल्या आणि १० ते १५ वर्षांपासून पूर्ण अनुदानावर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राथमिक सुविधाही का होऊ शकल्या नाही, याबाबत विद्यापीठालाच विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ यंत्रणेने संबंधित महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे सुविधा आहेत की नाही, याचा स्वयंस्पष्ट अहवाल १० जुलैपर्यंत सादर करावा, असे आदेश उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. नलिनी टेंभेकर यांनी २१ जून रोजी दिले.
जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांवर नजरअमरावतीमधील बैठकीत आपल्या महाविद्यालयांमधील असुविधांचा पाढा वाचणाऱ्या १६ महाविद्यालयांची यादीच सहसंचालकांनी विद्यापीठ कुलसचिवांना सोपविली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. तर उर्वरित महाविद्यालये अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. आता या महाविद्यालयांना अमरावती विद्यापीठाची यंत्रणा नेमकी कधी भेट देणार आणि कसा अहवाल देणार, याकडे शिक्षण क्षेत्रातील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.