लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे. डेंग्यू असल्यास जीविताला होणारा संभाव्य धोका लक्षात घेत डॉक्टरांकडून महागड्या तपासण्या व उपचार केले जात आहे. डेंग्यूची दहशत एवढी की रुग्ण स्वत:च शंका उपस्थित करून तपासण्या करण्याचा व डेंग्यू प्रतिबंधक उपचार करण्याचा आग्रह डॉक्टरांकडे धरु लागला आहे. यात मात्र भीतीने रुग्ण आर्थिक दृष्ट्या आणखी ‘अशक्त’ होताना दिसतो आहे. गोरगरीब रुग्ण उसनवारी करून महागडे उपचार सहन करीत आहेत.पावसाळ्यात अनेक ठिकाणी साथीचे आजार पसरतात. त्यातून तापाचे रुग्ण वाढतात. परंतु अलिकडेच या तापाला डेंग्यू सदृश दाखविण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. कोण्या जिल्ह्यात डेंग्यूने कुणाचा बळी गेला, आतापर्यंत बळींचा आकडा कितीवर पोहोचला याचीच चर्चा कोणत्याही शासकीय व खासगी रुग्णालयांमधील गर्दीतून ऐकायला मिळत आहे. त्याचा परिणाम दवाखान्यातील यंत्रणेतही दिसू लागला आहे. तेसुद्धा रुग्णाला डेंग्यूची तपासणी करून घ्या, असा सल्ला देताना दिसत आहे. खासगी रुग्णालयात दिसणारी गर्दी ही पावसाळ्यातील व्हायरल, साथीच्या आजारांची रुटीन असली तरी बाहेर चर्चा मात्र डेंग्यूचे रुग्ण वाढले, अशीच होताना दिसत आहे. साथीच्या आजारांमुळे शासकीय रुग्णालयात तर खाटा कमी पडू लागल्या आहेत. डेंग्यूची दहशत असल्याने रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये धाव घेतो आहे. तेथे तो स्वत:च ‘मला डेंग्यू तर नाही ना’ अशी शंका उपस्थित करताना दिसतो आहे. त्याने उपस्थित केलेली शंका पाहून अखेर अनेक डॉक्टरही मग इच्छा नसताना त्याला महागड्या तपासण्या व औषधोपचाराचा सल्ला देतात. या माध्यमातून महागड्या औषधांचा रुग्णांवर भडीमार केला जातो. कुण्या रुग्णाचे प्लेटलेटस् कमी झाले असेल तर हमखास डेंग्यूची ट्रीटमेंट केली जाते. डेंग्यूच्या या दहशतीआड गोरगरीब रुग्णांचे खिसे खाली होत आहेत. तपासण्या व महागड्या औषधी खरेदी करताना रुग्णांच्या नाकीनऊ आले आहेत. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील माहिती नसणे व जीवाची भीती यामुळे रुग्ण उसनवारी करून डेंग्यूची पूर्ण ट्रीटमेंट घेत आहे. यात तो कर्जबाजारी होतो आहे. मात्र प्रत्यक्षात यवतमाळ शहरात डेंग्यूची स्थिती नाममात्र असल्याची पुढे आलेली शासकीय आकडेवारी दहशतीत वावरणाºया नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती तरंग तुषारवारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शासकीय डॉक्टरांनी २२०० रुग्णांची गेल्या काही दिवसात तपासणी केली. त्यापैकी केवळ १९ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली. यातील १८ रुग्ण डेंग्यू सदृश असून एक प्रत्यक्ष डेंग्यूचा आढळून आला आहे. यावरून यवतमाळ शहरात डेंग्यूची साथ नसल्याचे सिद्ध होते. मात्र प्लेटलेटस् कमी झाल्यास त्या वाढविण्याच्या दृष्टीने तो रुग्ण डेंग्यू सदृश मानून तसे उपचार केले जातात. त्यात काहीच गैर नाही, रुग्णाचा जीव वाचविणे हा त्यामागे डॉक्टरांचा प्रामाणिक हेतू राहत असल्याचेही शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष घेणार ‘आरोग्य’ची बैठकयवतमाळ शहरात साथीचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद अध्यक्ष कांचन चौधरी या आगामी आठवड्यात आरोग्य विभागाच्या सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. साथीचे आजार वाढण्यासाठी नेमकी काय कारणे आहेत, कोणत्या भागात सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला जात नाही, कुठे नाल्या तुंबल्या आहेत, दूषित पाण्याचे सोर्स, शासकीय रुग्णालयांमधील व्यवस्था आदी मुद्यांवर त्या आढावा घेणार आहे. या बैठकीत डेंग्यू सदृश आजारांना लगाम लावण्यासाठी व्यापक उपाययोजना सूचविल्या जाणार आहे. त्यात शहरातील बाल रोगतज्ज्ञ व तज्ज्ञ डॉक्टरांना बोलविले जाणार आहे. रुग्णांमध्ये डेंग्यूची दहशत निर्माण करू नका, असे आवाहन त्यांना केले जाणार आहे.
२२०० पैकी केवळ १९ डेंग्यू सदृश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 9:45 PM
शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे.
ठळक मुद्देखासगी दवाखान्यांमध्ये गर्दी : डेंग्यूच्या दहशतीने महागडे उपचार