‘धिंड’ लघुचित्रपट येणार : यवतमाळच्या विकास कांबळे यांचे दिग्दर्शनलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोलाम जमातीवर ‘फोकस’ ठेवणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रामुख्याने गरिबीमुळे शाळाबाह्य राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे दु:ख मांडताना त्याच्या शिकण्याच्या जिद्दीवर ‘धिंड’ या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यवतमाळचे प्रा. विकास कांबळे यांच्या दिग्दर्शनात हा सिनेमा साकार होतोय.कोलाम समाजाचे प्रश्न वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. त्यामुळे चित्रपटातून हे प्रश्न समाजापुढे आणण्याचा निर्णय येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. विकास कांबळे यांनी घेतला. आंबेडकरी कवी म्हणूनही त्यांची ओळख आहे. धिंड या लघुचित्रपटात शाळाबाह्य विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असूनही ग्रामीण भागात शिक्षण घेण्याची साधी सोय उपलब्ध नाही. पितृछत्र नसलेला मुलगा शिक्षणापासून कसा दुरावतो याचे चित्रण यात राहणार आहे. गुरंढोरं चारताना त्याची शाळा शिकण्याची जिद्द हा या कथानकाचा गाभा आहे. चित्रीकरण विदर्भातील विविध स्थळांवर होणार आहे. निर्माता जितेश राठोड असून पटकथा संजय भालेराव यांची आहे. संगीत सुबोध वाळके यांचे असून स्थानिक कलावंतांना अभिनयाची संधी दिली जाणार असल्याचे दिग्दर्शक प्रा. विकास कांबळे यांनी सांगितले.
शाळाबाह्य विद्यार्थी रूपेरी वर्गात
By admin | Published: July 11, 2017 1:13 AM