लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू उद्रेकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वाढीव क्षेत्रातील कॉलन्यांमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून त्यात स्वच्छ पाणी आहे. याच पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. दर्डानगर परिसरातील प्राध्यापक कॉलनीत एका १९ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.अभय भीमराव ठोंबरे (१९) असे या युवकाचे नाव आहे. त्याची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही. त्यामुळे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारामुळे ताप व इतर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. खासगी डॉक्टरांना प्रतिबंध असल्याने डेंग्यू सदृश लक्षणे असूनही तशा रुग्णांवर उपचार होत नाही. यामुळे रुग्णांपुढे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शासनाची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोरोना संसर्गाच्या नियंत्रण कामात व्यस्त आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात डेंग्यूपासून जीवघेणा धोका आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सध्या तरी कुठलाही ठोस कार्यक्रम आरोग्य यंत्रणेकडून शहरात राबविला जात नाही.नगरपरिषदेचा मान्सूनपूर्व कामांना हरताळनगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व कामाकडे यावर्षी पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काही ठराविक नालेसफाई करून या कामाची मोहीम थांबविण्यात आली. गेल्या काही आठवड्यांपासून पाऊस जोरदार सुरू असून अनेक भागात पावसाचे डबके साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याला वाहते करून देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. परिणामी डेंग्यूसारख्या जीवघेण्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. शहरात धुराळणी अनेक महिन्यांपासून बंद आहे. कीटकजन्य आजारांचा उद्रेक होण्याची स्थिती असतानाही आरोग्य विभाग धुराळणी व कीटकशासकांची फवारणी करताना दिसत नाही.
यवतमाळात डेंग्यूचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:00 AM
डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही.
ठळक मुद्देयुवकाचा मृत्यू : आरोग्य यंत्रणा कोरोना उपाययोजनेत व्यस्त, गटारांमुळे आरोग्याला धोका