कैदी-बंद्यांंना लागण : पाणी योग्य, तर मग दूषित नेमके काय? लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जिल्हा कारागृहात गॅस्ट्रोचा उद्रेक झाला असून कैद्यांना टायफॉईडचीही लागण झाली आहे. कारागृहातील बंदीच नव्हे, तर कार्यरत कर्मचारी, अधिकारीही या आजाराने त्रस्त झाले. दूषित पाणी व दूषित अन्नामुळे हा आजार होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले जाते. जिल्हा कारागृहात २२४ पुरुष आणि पाच महिला बंद्यांना ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र सध्या गर्दी वाढल्याने ३११ बंदी आहे. कारागृहात जीवन प्राधिकरणच्या टाकीतूनच पाणीपुरवठा होतो. हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तरीही गेल्या १५ दिवसांपासून येथे गॅस्ट्रो आणि टायफॉईडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेक बंद्यांना प्रकृती गंभीर झाल्यामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. दोन तुरूंग कर्मचारीसुद्धा आजारी पडले. त्यांची दोन मुलेही टायफॉईडने आजारी असून खासगीत उपचार घेत आहे. श्रेणी दोनचे तुरूंग अधिकारी हेमंत इंगोले यांनाही गॅस्ट्रो-टायफॉईडची लक्षणे जाणवत आहेत. कारागृह प्रशासनाकडून दर महिन्यात पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. ११ मे रोजी पाणी नमुन्यांची तपासणी झाली. त्यात प्रयोगशाळेने पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे गॅस्ट्रो व टायफॉईडसारख्या आजाराची लागण नेमकी कशातून होते, हे निश्चित झाले नाही. वॉटर प्युरिफायरचा प्रस्ताव धूळ खात कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वॉटर प्युरिफायर व वॉटर कुलरची मागणी केली. ३ मे रोजी तीन लाख ५८ हजारांचा प्रस्ताव सादर केला. मात्र तो धूळखात आहे. त्यामुळे अद्याप येथील साथ नियंत्रणात आली नाही. दररोज कैद्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागत आहे. कारागृहातील दवाखान्यात आजारी बंद्यांवर उपचार केले जातात. प्राथमिक उपचाराची सुविधा येथे उपलब्ध आहे. त्यानंतरही साथ नियंत्रणात येताना दिसत नाही. कारागृहातील आरोग्यविषयक बाबींच्या पूर्ततेसाठी योग्य ती दक्षता घेत असल्याचे प्रभारी तुरुंग अधीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.
कारागृहात गॅस्ट्रोचा उद्रेक
By admin | Published: May 21, 2017 12:23 AM