महागाव : शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवडीवर भर दिला. मात्र, उगवलेल्या कोवळ्या सोयाबीनच्या कोंबांना वाणू नष्ट करीत आहेत. वाणूचा हल्ला मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी धास्तावले आहे.
गेल्यावर्षी वाणूच्या प्रकोपाने तालुक्यातील सोयाबीनचे अनेक प्लॉट उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कपाशीवर दरवर्षी होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवडीवर लक्ष केंद्रित केले. ज्या शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध होते, अशांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर लागवड केली. आता उगवलेल्या कोवळ्या कोंबावर वाणूचा हल्ला वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी विनोद मैंद यांनी सोयाबीनची नुकतीच लागवड केली. मात्र, उगवलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या कोंबांवर वाणूचा हल्ला होत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्रावर यंदा सोयाबीन आणि तुरीचा पेरा वाढला आहे. कपाशी लागवड पहिल्यांदाच दहा टक्क्यांवर आली आहे. कपाशीवर दरवर्षी येणाऱ्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांनी यंदा जवळपास कपाशी हद्दपार केल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॉक्स
कपाशी बीजोत्पादन कंपन्यांना धडकी
कपाशीवर विविध रोगांच्या प्रादुर्भावाची संबंधित कंपन्यांनी पाहिजे तशी दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत परिवर्तन करून नवीन प्रयोग अंगिकारला. त्यामुळे कपाशी बियाणे बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे.
कोट
अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर वाणूचा प्रादुर्भाव होतो. जोराचा पाऊस कोसळून गेल्यावर रिमझिम पाऊस असल्याससुद्धा वाणूचा प्रादुर्भाव वाढतो. यावर आंतर पीक डवरणी, मशागत हे अत्यंत प्रभावी ठरते. वाणूचे आयुर्मान जास्त दिवस नसते. दोन आठवडे याचा प्रादुर्भाव राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतर मशागत केल्यास वाणूचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रमोद यादगिरावार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, के.व्ही.के. यवतमाळ.