लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात आता मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराचे थैमान घातले आहे. सरकारी रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाकडे रुग्णांचा वाढता कल वाढला आहे. त्यामुळे सध्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालये हाउसफुल झाल्याची चित्र आहे.पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागातीलच नाली सफाई होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांतील नालीतून दुर्गंधी येत असून, नागरिकांना नाली परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे. परिणामी, विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील अनेक भागांत तापाची साथ सुरू असून, दररोज डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातून दररोज शेकडो रुग्ण येतात, परंतु डॉक्टरांच्या कमतरतेमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बरेचदा या रुग्णांना दाखल करून घेतल्या जात नाही. विशिष्ट वेळेत याल तरच उपचार करू, अशी भूमिका या रुग्णालयाची असल्याचा आरोप रुग्ण करीत असून, दिलेल्या वेळेतच आजारी पडावे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हीच अवस्था तालुक्यातील ग्रामीण भागातही असून, तिथेही इतर आजारासोबतच डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. चिखलमय रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, अस्वच्छ पिण्याचे पाणी यामुळे ग्रामीण भागात डेंग्यू आजार जोर पकडत आहे. तालुक्यात वाढते आजार पाहता, हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संततधार पाऊसच ठरतोय घातक- या वर्षी तालुक्यात अर्धा पावसाळा संपला, तरी मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे शहरातील व गावातील घाण व काडी कचरा वाहून गेला नाही. गेल्या आठवड्यात रिपरिप पाऊस सुरू होता. त्यामुळे ही घाण सडून चिखलाचे साम्राज्य वाढून रोगराईला चालना मिळाली. यामुळे आजारात वाढ होत आहे, तसेच वातावरणातही सतत बदल होत असून, दिवसभर उन्ह व सावलीचा खेळ सुरू असतो. वातावरणातील या बदलांमुळेही अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. विशेषत: या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना चांगलाच फटका बसत आहे.