आमदार इंद्रनील नाईक : निधीतून आवश्यक सोई- सुविधा पुरविणार
पुसद : उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असून, शहरातील काही अपवाद वगळता बहुतांश खासगी दवाखान्यांत रुग्णांची सर्रास लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्याबाबत आमदार इंद्रनील नाईक व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यात नुकतीच सकारात्मक चर्चा झाली.
उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक सुविधा आपल्या आमदार निधीतून पुरविण्यात येतील, असे आश्वासन आमदार इंद्रनील नाईक यांनी १ मे रोजी रुग्णालय प्रशासनाला प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले. यावेळी आमदार नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. दाखल कोविड रुग्णांसह लस घेण्यासाठी आलेले नागरिक तसेच नर्स व डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. खासगी रुग्णालयापेक्षा चांगली सुविधा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सांगा, असे आमदारांनी म्हणताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे व इतर उपस्थित डॉक्टरांनी रुग्णासाठी लागणारे इंजेक्शन, यंत्रसामग्री व आवश्यक साहित्याची भली मोठी यादीच आमदारांसमोर सादर केली. त्या यादीनुसार १५ दिवसांच्या आत सर्व आवश्यक सामग्री व सुविधा आमदार निधीमधून देणार असल्याचे आमदार नाईक यांनी आश्वासित केले.
रुग्णालयातील व्हेंटिलेटर चालविण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी वृंद आदींची व्यवस्था व ऑक्सिजन प्लांट उभारण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. अग्रवाल मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारण्यासंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.