यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेकांनी खाबूगिरीचे कुरण तयार केले आहे. अतिदक्षता उपचार कक्षात (आयसीसीयू) ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही. याच्या वारंवार अनेक तक्रारी झाल्या. मात्र देखभाल दुरुस्ती कंत्राटदार हलायला तयार नाही. यात सहायक प्राध्यापक व एका तंत्रज्ञाची भागीदारी असल्याने आयसीसीयू ऑक्सिजन अभावी गुदमरत आहे.
गोरगरिबांना संजीवनी देणाऱ्या रुग्णालयात उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यातही अतिदक्षता उपचार कक्षात प्रत्येक रुग्णाचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू असतो. येथे काम करणारे डॉक्टर, नर्सेस यांची प्रत्येक जीव वाचविण्याची तगमग असते. अशा स्थितीत केवळ त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त नसल्याने मृत्यूचा धोका वाढला आहे. व्हेन्टिलेटरसारखे जीवनावश्यक यंत्र चालविण्यासाठी विशिष्ट दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा लागतो. नेमकी हीच अडचण आयसीसीयूमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत जबाबदार डॉक्टरांनी वारंवार रुग्णालय प्रशासन प्रमुखाला माहिती दिली. मात्र तत्कालीन प्रशासनाकडून याची दखलच घेण्यात आली नाही.
ऑक्सिजनच्या व्यवहारात रंगलेल्या सहायक प्राध्यापकाने पैसा गोळा करण्याचे साधनच उभे केले आहे. एका तंत्रज्ञाला हाताशी धरुन रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईन, सेंट्रल पाईपलाईन, सेंट्रल सक्शन याच्या देखभालीचा ठेका स्वत:च्या मर्जीतील व्यक्तीच्या नावाने घेतला आहे. त्यामुळे पाईपलाईनची व त्याच्या नोझलची दुरुस्ती वेळेत होत नाही. ऑक्सिजन लिक असल्याने त्याचा योग्य दाबात रुग्णाला पुरवठा होत नाही. ऑक्सिजन पाईपलाईनच्या लिकेजेसमुळे जीविताचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र पैसा गोळा करण्याची धुंदी चढलेल्यांना मानवी जीविताचे काहीच देणे घेणे नाही असे दिसून येते.
अशी केली निविदा मॅनेज
ऑक्सिजन पुरवठा पाईपलाईन देखभाल दुरुस्तीचे कंत्राट एक वर्षाकरिता दिले जाते. १५ लाख रुपयाच्या या कंत्राटासाठी पहिल्यांदा आलेल्या निविदा केवळ उघडल्या. त्यात कार्यादेश देण्यात आले नाही. नंतर काही अटीशर्ती टाकून पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. त्यासाठी एका तंत्रज्ञाला सोबत घेऊन मर्जीतील व्यक्तीच्या नावाने ही निविदा दाखल केली. त्याच व्यक्तीच्या नावाने आलेल्या निविदेला देखभाल दुरुस्ती कंत्राट देण्यात आले.
ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींगसाठी दोन टक्के कमिशन
शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग कंत्राटाची मुदत चार महिन्यापूर्वी संपली आहे. मात्र दोन टक्के कमिशन मिळत नसल्याने या कंत्राटाला मुदतवाढ देण्यासाठी टोलवाटोलवी सुरू आहे. नियमित पुरवठादार असल्याने व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मानवी दृष्टिकोनातून हा पुरवठा सुरू आहे. मात्र येथेही कमिशनखोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.